छत्रपती संभाजीनगर Ellora Ajanta Festival 2024 : सोनेरी महलात सुरू असलेल्या वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात दुसरा दिवस सरोद वादक आमिर - अयान अली बंगश आणि गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी गाजवला. यावेळी "या भूमीत सरोद वादन करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो," अशा भावना प्रख्यात सरोद वादक आमिर आणि आयन अली बंगश यांनी व्यक्त केल्या. तर पद्मश्री कैलास खेर प्रेक्षकांशी संवाद साधतांना म्हणाले की, "आज तुम्ही सगळे प्रेक्षक परमात्माचे अंश होऊन माझ्यासमोर बसले आहात. आजचा हा क्षण निश्चितच आयुष्यभरासाठी लक्षात राहील," अशा भावना व्यक्त करत त्यांनी रसिकांची मनं जिंकली.
आमिर आणि आयन अली बंगश यांच्या सरोद वादनाची भुरळ :शनिवारी वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षकांनी सरोद वादक आमिर आणि आयन अली बंगश यांची रमणीय संगीत मैफल अनुभवली. त्यांच्यासोबत त्यांनी राग देश, राग किरवाणी आणि लोकगीतांचा सुंदर संगम सादर केला. उत्तरी भारतीय राग खमाज थाटात मोडतो. तो हलक्या शास्त्रीय आणि हंगामी रचनांसाठी प्रसिद्ध आहे. यात 19 आणि 16 बीट्सच्या तालावर सादर केलेली रचना रसिकांना अनुभवता आली. त्याचप्रमाणं बंगाल आणि आसामच्या लोकसंगीतावर आधारित भाटियाली आणि बिहू राग सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, 1905 मध्ये नोबेल पुरस्कार विजेता रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं आणि लिहिलेलं एक प्रसिद्ध गाणंही ऐकायला मिळालं. राग किरवाणी हा राग वाद्य संगीतासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याचे स्वर पश्चिमी संगीतातील हार्मोनिक मायनर रागासारखे आहेत. हा राग ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या गायनानं प्रेक्षक भारावले :वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात दुसऱ्या दिवशी विश्व विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांचं आगमन होताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि हात उंचावून स्वागत केलं. त्यांनी "तौबा तौबा वे तेरी सुरत.."हे गीत गायला सुरुवात केल्यावर संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. पद्मश्री कैलास खेर यांनी "आओजी....", "मैं तो तेरे प्यार में दिवाना..", "तौबा तौबा वे तेरी सुरत..", "तू जाने ना..", "कैसे बताएं क्यू तुझको चाहे..." "पिया के रंग, रंग दी नी ओढ़नी..", तेरे बिन नहीं लगता..." "कौन हैं वो कौन हैं..", "तेरे नाम से जी लूं.." , आदी गाणी गायली. कैलास खेर दुसऱ्यांदा या महोत्सवात आले आहेत. सोनेरी महल इथं आयोजित वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायक कैलाश खेर यांना ऐकण्यासाठी गर्दीचा उच्चांक प्रस्थापित झाला. सोनेरी महल बाहेर लावलेल्या स्क्रिनसह ऑनलाईन देखील रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाचा आस्वाद घेतला. यावेळी पद्मश्री कैलास खेर यांचा राधावल्लभ धुत, समिती अध्यक्ष जी. श्रीकांत, मोक्षदा पाटील (आयपीएस) यांच्या हस्ते पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी घेतला कार्यक्रमाचा आस्वाद :महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महोत्सवाचे सह अध्यक्ष जी श्रीकांत, लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, मोक्षदा पाटील (आयपीएस), अंजली कराड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, महोत्सवाचे समन्वयक अनिल इरावने, सारंग टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा :
- छत्रपती संभाजीनगरचं वैभव; पारंपरिक संगीतानं उत्साहात सुरू झाला वेरुळ अजिंठा महोत्सव
- Ajanta Caves : अजिंठा, वेरुळ जागतिक वारसा स्थळ दर्जा अडचणीत