परभणी :बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज परभणी इथं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी इथं काढण्यात आलेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे, ज्योती मेटे आदींसह देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहेत. नागरिकांनी मोर्चात मोठी गर्दी केली आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी या आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी परभणीत मूक मोर्चा :मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मूक मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आहे. या मोर्चात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी "पकडण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करावी. या आरोपींना कोणी पाठीमागे लपवलं, त्यांच्यावर हत्येत सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी केली.
आरोपींच्या मागे कोण हेही स्पष्ट होईल - धनंजय देशमुख :संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी एका मागून एक पुण्यातून अटक होत आहेत. त्या ठिकाणी त्यांना कुणीतरी अभय देत होतं. त्यांच्या मागे कोणीतरी आहे आणि आता आरोपी अटक होत असल्यानं त्यांच्या तपासात या प्रकरणामागे कोण आहे हेही स्पष्ट होईल, असा विश्वास संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आज 4 जानेवारी रोजी परभणीत सर्वपक्षीय काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान संतोष देशमुख बोलत होते. परभणी शहरातील मुख्य रस्त्यानं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पुढं बोलताना धनंजय देशमुख यांनी आम्ही एका विकृती विरुद्ध लढत आहोत असं सांगितलं. आजच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील २ फरार आरोपींना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आता राहिलेल्या एका आरोपीला देखील पकडावं, असं धनंजय देशमुखांनी म्हटलं. आरोपींवर मोक्का लावलाच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा :
- संतोष देशमुख हत्याकांड : अखेर सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंना सीआयडीनं ठोकल्या बेड्या, केज पोलिसांच्या केलं हवाली
- अटक केलेल्या आरोपींना बीड जिल्ह्यात ठेवू नये-भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी
- संतोष देशमुख हत्याकांड: मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची आमची मागणी; मी राजीनामा का द्यावा, धनंजय मुंडेंचा सवाल