मुंबई Sanjay Raut News : देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच वेगवेगळ्या संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. त्यामध्ये एनडीए प्रणित भाजपा सत्तेत विराजमान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात दावे प्रतिदावे करत आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधलाय.
काय म्हणाले संजय राऊत : यासंदर्भात आज (3 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाच्या संदर्भात लोकांमध्ये अनेक शंका आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्र संविधानिक संस्था आहे. परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजेच विरोधी पक्षातील सर्वांना जाऊन वारंवार हात जोडावे लागतात आणि काही गोष्टी त्यांच्यासमोर मांडाव्या लागतात. निवडणूक आयोग देखील ऐकून न ऐकल्यासारखं करतो. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या काळात ध्यानाला बसतात आणि पूर्ण लक्ष आपल्याकडं केंद्रीत करतात. हा एक प्रकारे आचारसंहितेचा भंग आहे. देशाचे गृहमंत्री देशातील विविध भागातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सूचना देतात, हे देखील आचारसंहितेचं उल्लंघन आहे. पोलिंग एजंटला थांबवलं जातं हे देखील कधी अगोदर घडलेलं नाही."