मुंबई- अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर मुंबईसह बॉलीवुडमध्ये खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील सामान्यांसह सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडं भाजपा नेते राम कदम यांनी कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननं (AICWA) मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, "बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नानंतर त्यांच्यावर धक्कादायक पद्धतीनं हल्ला झाला. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईत उच्चपदस्थ व्यक्तींना लक्ष्य करून होणाऱ्या वाढणाऱ्या गुन्ह्यांबाबत चिंता निर्माण झाली आहे".
देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी-सैफ अलीवरील हल्ल्याबाबत शिवसेनेचे (यूबीटी) नेते आनंद दुबे म्हणाले, " या देशात सेलिब्रिटी आणि व्हीआयपी सुरक्षित नसतील, तर सामान्य लोकांचे काय होणार आहे? यापूर्वी सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकींची हत्या झाली. आता सैफ अली खानवर चाकूनं वार करण्यात आलेत. ही दुर्दैवी घटना आहे. मुंबईत कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी."
कायद्याचा कमी झाला धाक-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्या क्लाईड क्रॅस्टो यांनी या हल्ल्यावरून चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला हा चिंतेचा विषय आहे. जर त्याच्यासारख्या सेलेब्रिटी आणि कडक सुरक्षा असलेल्या लोकांवर त्यांच्याच घरात हल्ला होऊ शकतो, तर सामान्य नागरिकांनादेखील काळजी करावी लागेल. गेल्या २-३ वर्षांत महाराष्ट्रात कायद्याचा आणि पोलिसांचा धाक कमी झालेला दिसतो. कारण गुन्हे करणाऱ्यांवर उदारता दाखविली जात आहे. या हल्ल्याकडं राज्याच्या गृह विभागानं खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. गृह विभागानं मुंबई आणि राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे."
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली-मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे (यूबीटी) खासदार, नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हमाले, "सैफ अली खान हा पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलेला कलाकार आहे. तो आणि त्याचे कुटुंब पंतप्रधान मोदींना भेटले होते. त्याच्यावर चाकू हल्ला होताना पंतप्रधान मोदी मुंबईत होते. हा हल्ला पंंतप्रधानांसाठी धक्का आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. मुंबई आणि बीडमध्ये काय घडत आहे? राज्यातील सामान्य जनता सुरक्षित नाही. अशा घटना दररोज घडत आहेत."
- भाजपा नेते राम कदम म्हणाले, "पोलिसांच्या मते, एक माणूस लुटण्याच्या उद्देशानं अभिनेत्याच्या घरात घुसला. त्या माणसाशी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खान जखमी झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. अशी घटना पुन्हा घडू नये, याची खात्री करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे."
हल्लेखोर आधीपासूनच होता घरात-"आताच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येणार नाही. यात अजूनही कोणता कट, कोणती योजना किंवा कुठल्या गँगचा सहभाग असल्याचं समोर आलेलं नाही. आजच्या घटनेला आधीच्या दोन घटनांशी जोडणं योग्य होणार नाही. जखमी झालेली एक महिला आधीपासूनच घरात होती. हल्लेखोर आधीपासूनच घरात असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांतर्फे तपास करण्यात येत आहे. तपास झाल्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल," अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं. त्यांनी सैफची मेहुणी, अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी फोनवरून संवाद साधत अभिनेता सैफ आणि त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.