पुणे- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचात देशातील अनेक नेते मंडळी प्रचारात आले आहेत. काँग्रेसनं इतर राज्यात दिलेल्या गॅरंटी पूर्ण केली नसल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत टीका केली होती. यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसच्या गॅरंटीवरून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हान दिले. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले, "खरंच तुमच्यात हिम्मत असेल तर एक कमिटी बनवा आणि तेलंगणाला पाठवा. जर यायला पैसे नसेल तर हेलिकॉप्टर पाठवतो. आम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या की नाही ते बघा."
गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या आहेत-ते पुढे म्हणाले, " आम्ही तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. 25 दिवसात 18 हजार कोटी रुपये देऊन 23 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तसेच या दहा महिन्यात 50 हजार सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच महिलांना मोफत बस सेवादेखील देण्यात आली. आम्ही गरीब लोकांना 500 रुपयात सिलेंडर आणि सर्वसामान्य लोकांना मोफत 200 युनिट वीज दिली आहे. घोषणांप्रमाणं काँग्रेसनं गॅरंटी पूर्ण केल्या आहेत. या गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या आहेत. मोदी सरकारच्या गॅरंटी नाहीत. निवडणुकीला दोन दिवस शिल्लक असताना जर कोणाला येऊन बघायचे असेल त्यांनी बघावे. जर या गॅरंटीत चुकीचे असेल तर आम्ही माफी मागू," असे यावेळी रेड्डी म्हणाले.