नाशिक Remove illegal hoardings in Nashik - मुंबईतील घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकार आणि प्रशासन सतर्क झालं आहे. पावसाळा तोंडावर आला असून हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते हे घाटकोपरच्या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना आपापल्या हद्दीतील लोखंडी होर्डिंगची रचनात्मक तपासणी करण्यात यावी,अवैध होर्डिंग तातडीनं हटवून संबंधित होर्डिंग लावणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी तसंच अधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे आदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव लहू माळी यांनी नाशिकसह सर्वच महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी - नागरिकांनी वादळी वारा किंवा पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी होर्डिंग, कमान, झाडे, पत्र्याचे शेड याचा आधार घेऊ नये, याबाबतच्या सूचना नागरिकांना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात असंही आपत्ती व्यवस्थापन विभागानं नाशिक महानगरपालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
अनधिकृत होर्डिंग काढून टाकावे - नाशिक शहरात पादचारी मार्गासह अनेक चौकाचौकात अनाधिकृतपणे काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग उभारले आहेत. अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवण्याची मागणी होऊ लागली आहे. तसंच जे उंच होर्डिंग आहेत तेही कमी करावे किंवा काढून टाकावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे.
6 महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचे - गेल्या काही वर्षापासून नाशिकमध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलं आहे. पावसाळ्या व्यतिरिक्तही वारंवार वादळाचं प्रमाण वाढल्यानं बदलत्या वातावरणामुळं लोखंड गंजण्याची प्रक्रिया जलद गतीने घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाहिरात फलकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नियमित निगा आणि देखभाल राखणं आवश्यक आहे. जाहिरात फलकांमुळे कोणत्याही दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील जाहिरात फलकांसाठी दर सहा महिन्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे तसं प्रशासनानं नमूद केलं आहे. परंतु हे नियम कितपत पाळले जातात हा ही एक प्रश्नच आहे.
गुलमोहराचे झाडे धोकादायक बनली - गुलमोराचं झाड उन्मळून पडल्याच्या घटना शहरात मागील दोन वर्षात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे वित्त आणि जीवितहानी देखील यापूर्वी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्र्यंबक रोडवर रिक्षावर गुलमोराचं झाड पडून यात रिक्षाचालकासह एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत रिक्षाचा पुरता चंदामेंदा झाला होता. त्याच दरम्यान लेखानगरमध्ये गुलमोराच्या झाडाखाली फांदी एका युवकाच्या डोक्यावर पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत एक जण जखमी झाला होता. तसंच नाशिकच्या वकीलवाडी भागात रस्त्यावर गुलमोराचं झाड पडल. सुदैवाने यात जीवित हानी झाली नव्हती. मात्र या ठिकाणी असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं. वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेने धोकादायक झाडांचं सर्वेक्षण करून ही झाडं काढून घ्यावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा..
- पेट्रोल पंप असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा, आणखी काहीजण होर्डिंगखाली अडकल्याची भीती - Ghatkopar Hording Collapsed
- अवकाळी पावसाळ्यात वीज कोसळण्यासह होर्डिंग कोसळण्याची भीती, धोका टाळण्याकरिता 'अशी' घ्या काळजी - safety tips in rain