मुंबई - Vijayakanth Padma Bhushan : सुपरस्टार रजनीकांत यांनी दिवंगत अभिनेता आणि डीएमके नेता विजयकांत यांना मिळालेल्या मरणोत्तर 'पद्मभूषण' सन्मानाबद्दल एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. यामध्ये रजनीने आपल्या जवळच्या मित्राच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आणि आपल्या 'प्रिय' मित्राची किती आठवण येते हे व्यक्त केलं. जानेवारीमध्ये भारत सरकारने 2024 साठी पद्म पुरस्कार जाहीर केले होते, यामध्ये विजयकांत यांचे नाव मरणोत्तर 'पद्मभूषण' सन्मानासाठी निवडले होते.
दिवंगत अभिनेता विजयकांत यांना 9 मे 2024 रोजी मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात आला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची पत्नी प्रेमलता विजयकांत यांना हा सन्मान प्रदान केला. अनेक सेलिब्रिटींनी अभिनेता विजयकांत यांच्या 'पद्मभूषण' पुरस्काराबद्दल कृतज्ञता दर्शवली. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच रजनीकांत यांनी मित्राला मिळालेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रजनीकांत म्हणाले, "केंद्र सरकारने दिवंगत अभिनेता आणि माझे मित्र विजयकांत यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले, हा आनंदाचा क्षण आहे, आणि त्याचा इतिहास पद्म 2024 च्या पुस्तकांमध्ये समाविष्ट केला जाईल. हा त्यांच्यासाठी देखील मोठा सन्मान आहे."
डीएमके पक्षाचे नेता म्हणून लोकप्रिय असलेल्या विजयकांत यांचा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं चेन्नईतील मिओट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर मिओट रुग्णालयात विजयकांत यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण तामिळनाडूवर शोककळा पसरली होती.
'कॅप्टन' म्हणून सर्वत्र ओळख असलेले विजयकांत यांचे जीवन तमिळ चित्रपट उद्योगातील यशस्वी कारकीर्दीमुळे सर्वपरिचीत आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 154 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नादिगर संगम (अधिकृतपणे दक्षिण भारतीय कलाकार संघटना (SIAA) म्हणून ओळखले जाते) येथे पदावर असताना, विजयकांत यांनी दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणले. त्यांनी विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले होते.
हेही वाचा -
- 'हे नुकसान कधीही भरून न येणारं': रजनीकांत यांनी डीएमडीके प्रमुख विजयकांत यांना वाहिली अखेरची श्रद्धांजली
- 'अभिनेता विजयकांत गेला यावर विश्वास बसत नाही'; 9 वीतील मित्रानं जागवल्या 'कॅप्टन'च्या आठवणी
- डीएमडीकेचा कॅप्टन हरपला; अभिनेता विजयकांतनं घेतला अखेरचा श्वास