पुणे : दक्षिणेकडील राज्यातील नेतेमंडळी, अभिनेते, साहित्यिक हे त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात. कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेते कावेरी नदीच्या पाणी प्रश्नात एकत्र आल्याचं आपण पाहिलं. अशाच पद्धतीनं राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास, कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार: विश्व मराठी संमेलनाची सांगता राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी माणसाचं अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे : "आपण आपल्या भाषेवरती ठाम राहायला हवं. आज फ्रेंच लोकांना आपल्या भाषेचा भरपूर अभिमान आहे. त्यामुळं त्यांच्याशी फ्रेंचमध्येच संवाद साधावा लागतो. आपण आपल्या भाषेतून इतिहासातून बोध घेणार नसेल, तर त्याचा काही फायदा नाही. आपल्याला इतिहास आणि भूगोल माहिती असायलाच हवा. काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतर, बाहेरील लोकांना तेथे जमिनी घेता येतात. मात्र, आजही हिमाचल, आसाममध्ये आणि इतर राज्यातील जमीन विकत घेऊ शकत नाही. अशावेळी महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्या, उद्योजकांना का मोकळीक दिली? हजारो एकर जमिनी बाहेरच्या लोकांकडून खरेदी केल्या जात आहेत. जमिनी जाणार असतील आणि लोक बेघर होणार असतील तर काही कामाचं नाही. ते अस्तित्व मिटवण्याचा प्रकार असतो. अशावेळी मराठी भाषिकांचं अस्तित्व टिकलं नाही तर मराठी भाषा कुठून टिकेल. त्यामुळं राज्य सरकारनं मराठी माणसाचं अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत", असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.