मुंबई Raj Thackeray On Marathi : नवी मुंबई इथल्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा पुन्हा सूर आळवला. "पंतप्रधानांना सुद्धा आपल्या मातृभाषेबाबत प्रेम लपवता येत नाही, तर महाराष्ट्रानं का म्हणून का आपलं प्रेम लपवावं?" असा खडा सवाल त्यांनी नवी मुंबईत आयोजित संमेलनात केला. राज्यातील मराठी सोडून इतर भाषांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सर्व शाळा मराठी सक्तीचं करा, अशी विनंती त्यांनी शासनाला केली. मराठीत बोला याचा आग्रह आणि कळकळीचं आवाहन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी सक्तीचा विषय केल्याचा खुलासा केला.
मी कडवट मराठी भाषिक :विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संदर्भात चौफेर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शासनाला काही ठिकाणी चिमटे देखील घेतले. शासनाचे उपस्थित मंत्री आणि अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, की " मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर तसे कडवट मराठी असण्याचे संस्कार झालेले आहेत. माझ्या वडिलांचे तसेच बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील अनेक बुजुर्ग लोकांचे देखील माझ्यावर संस्कार झालेले आहेत. जसजशी मराठी भाषा मला समजत गेली, तसतसा मी तिच्या अधिक प्रेमात पडत गेलो. म्हणून मी मराठीत बोलण्याचा, मराठीत वागण्याचा आग्रह धरतो. इतर भाषेविषयी माझा विरोध नाही.
महाराष्ट्रात मराठी शाळा बंद, अमेरिकेत होतायत सुरू :महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होताना अमेरिकेत मात्र मराठी शाळा सुरू होतात, हे काय कमी आहे का ?असा चिमटा देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राज ठाकरेंनी याप्रसंगी घेतला. जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये तो काम, उद्योग धंदा नोकरी निमित्तानं गेलेला आहे. त्यामुळं आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आहे. मराठी भाषा श्रीमंत आहे, जिथं जाईल तिथं मराठी भाषा पसरवली पाहिजे. युरोप देश महाराष्ट्रापेक्षा छोटा आहे. परंतु ते त्यांच्या देशात त्यांच्या भाषेत व्यवहार करतात, बोलतात. आपण मात्र मराठी बोलताना अंग चोरतो.
हिंदी राष्ट्रभाषा कधीच नव्हती आणि नाहीच :राज ठाकरेंनी भाष्य करताना हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, म्हणत हिंदी राष्ट्रभाषा समर्थकांवर सडकून टीका देखील केली. देशामध्ये कोणतीही एक राष्ट्रभाषा नाही. हिंदी तर बिलकुलच नाही. हे ठणकावून सांगत असताना राज ठाकरे यांनी याबाबतचे देखील आपले मुद्दे स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये आपले मराठी लोकं जेव्हा मराठी सोडून हिंदी बोलतात, त्यावेळेला राग येतो. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी भाषा तशी गुजराती, तामिळी, बंगाली, आसमी आणि तेलंगणात तेलगू आहे. तशीच हिंदी ही देखील एक भाषा आहे. ती राष्ट्रभाषा नाही, बिलकुल नाही, हे लक्षात घ्या. मनाशी खुणगाठ बांधा, आपल्याकडं राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालेलाच नाही. केंद्र शासनानं राजकारभाराची भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजी ठेवलेली आहे. हिंदी भाषेला माझा विरोध नाही. जेव्हा मराठीसाठी आंदोलन झालं, मला तेव्हा विरोध झाला. तेव्हा आम्ही गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल समोर ठेवला. हिंदी चित्रपट गीत, हिंदी चित्रपट याचे संस्कार झाले म्हणून हिंदी आपल्या अंगावर आली. जेव्हा मराठी भाषेसाठी आंदोलन झालं, तेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीमधील अनेकांना मराठीचे कंठ फुटले. तोपर्यंत त्यांना मराठीचा कंठ फुटला नव्हता, अशी टीका राज ठाकरे यांनी याप्रसंगी केली.
हेही वाचा :
- मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा सरकारला टोला, वाचा जरांगे पाटलांना उद्देशून काय म्हणाले
- 'हे' बोलणं बरं नव्हं; राज ठाकरेंनी टोचले मराठी कलाकारांचे कान
- वाहनांची रांग पाहून राज ठाकरे उतरले टोल नाक्यावर; मग काय झालं? पाहा व्हिडिओ