पुणेDrug Stock Seized In Pune: काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, सांगली येथे कारवाई करत जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचे 1750 किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. दरम्यान आज (2 मार्च) पुन्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात छापेमारी करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 340 किलो मेफेड्रोन सदृश्य साठा पकडण्यात आला आहे. एका टेम्पोतून हा माल पकडण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मेफेड्रोनच्या साठ्याचा ट्रक पकडला :याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, पुण्यात याआधी जे आरोपी अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. यावेळी विश्रांतवाडी येथे गोडाऊनमध्ये माल सापडला होता. आरोपीकडून मेफेड्रोन सदृश्य साठा टेम्पोमध्ये देखील ठेवण्यात येत होता. आज पोलिसांकडून तो ट्रक शोधून काढण्यात आला आहे. ड्रग्जचे जे गोडाऊन होते त्यापासून 3 किमी लांबवर हा टेम्पो ठेवण्यात आला होता. तिथं आज (2 मार्च) कारवाई करत जवळपास 340 किलोचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. एमडी आणि मॅथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते या गाडीत ठेवण्यात आलं होतं. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
आतापर्यंत 9 आरोपींना अटक :पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 7 ते 8 आरोपी हे फरार असून आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून होलसेल मार्केटमध्ये जागोजागी पाहणी केली जात आहे. ड्रग्जची तस्करी करणारे लाेक आमच्या रडारवर असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.