पुणे : पुणे पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलं होतं. या प्रकरणाचा अधिकचा तपास करत पोलिसांनी पुण्यातील विश्रांतवाडी येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केलं आहेत. तर, कुरकुंभ येथे हे अंमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या भारत माने आणि अजय अमरनाथ कोरसिया (वय 35 वर्ष, राहणार पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) यांना काल अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिकचा तपास करत मिळालेल्या माहितीनुसार आज ही कारवाई करण्यात आली.
विविध पथकांच्या माध्यमातून तपास : या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, 'पुण्यातील अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील अटक असलेल्या 3 आरोपींची कसून चौकशी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रांतवाडी परिसरात दोन गोडाऊनची झडती घेण्यात आली. त्यामध्ये 55 किलो एमडी हे जप्त करण्यात आलं आहे. अजून तपास केला असता कुरकुंभ एमआयडीसी परिसरात असलेल्या एका केमिकल फॅक्ट्री येथे हे अमली पदार्थांची तस्करी तयार करण्यात येत होतं. तिथं कारवाई करत 550 किलो एमडी जप्त करण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण 600 किलो एमडी जप्त करण्यात आलं आहे. याची किंमत ही 1100 कोटी रुपये एवढी आहे. याचा पंचनामा करण्यात आला असून संबंधितांना अटक करण्यात आली आहे. तसंच, विविध पथके तयार करून देशातील विविध भागात पाठवण्यात आलं आहे, अशी माहितीही कुमार यांनी दिली.
ड्रग्स फ्री पुणे :अमितेश कुमार याबाबत पुढे म्हणाले की, "जे कोणी अशा पद्धतीनं अवैध गोष्टी करत आहेत, त्यांना आळा घालण्यात येणार आहे. कुरकुंभ येथे जी कारवाई करण्यात आलेली ती केमिकल फॅक्ट्री साबळे नावाच्या व्यक्तीची आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याचा तपास हा सुरू आहे, असंही कुमार यांनी सांगितलं.
तिघांना अटक : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या 2 दिवसांत 600 किलो एमडी तब्बल 1100 कोटी रुपयांचं ''मेफेद्रोन ड्रग्स'' जप्त केलं आहे. पुणे शहरातील एका गोदामातून तसंच कुरकुंभमधील एका एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कारखान्यात अशा एकूण दोन कारवाईमध्ये हे एमडी जप्त करण्यात आलेलं आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत 3 जणांना अटक केली आहे. यातील हैदर शेख या आरोपीकडून विश्रांतवाडी येथे असलेल्या एका गोदामातून 100 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसंच, कुरकुंभ येथे असलेल्या अनिल साबळे यांच्या एका कारखान्यातून हे एमडी ड्रग्स तयार करण्यात येत होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एका रसायन शास्त्रज्ञयाचा देखील सहभाग आहे. संपूर्ण प्रकरण आंतरराष्ट्रीय पेडलरपर्यंत पोहोचलं. याचा सखोल तपास पोलीस करत असल्याची माहिती कुमार यांनी दिली आहे.