नागपूर/मुंबई - हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. शेवटच्या दिवशी खातेवाटप लवकरच होणार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी खाते वाटप झालेलं तुम्हाला दिसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अजितदादा नाराज नाहीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, अजितदादा माझी परवानगी घेऊन बीडच्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेत. त्यामुळं तुम्ही अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या चालवू नये. चुकीच्या बातम्या नको म्हणून स्पष्टीकरण देतोय, असं फडणवीस म्हणाले. विरोधकांनी फक्त विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. मात्र सभागृहात हेच प्रश्न उपस्थित केले असते तर बरं झालं असतं. सहा दिवसात भरगच्च कामकाज झालं. चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटीची रुपयांची तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे नक्षलवादी मुद्दा सभागृहात मांडला गेला. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला हे सरकार काय देणार? यावर मी सभागृहात सव्वा तास बोललो आहे. बळीराजा योजनेसाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रमधील मागासवर्ग हा मुख्यत: आमच्या विकासाचा अजेंडा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चौफेर विकासकामांना प्राधान्य - सध्या कापूस तुरीला चांगला भाव मिळतोय. सीसीआयमध्ये कापूस येत नाही. राज्यातील मागास भागात आमच्या सरकारनं परिवर्तन केलं. 0.72 टक्के व्याजाने नागपूर मेट्रोसाठी कर्ज घेतलं. विदर्भ-मराठवाड्यातील पिकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. संत्री बागायतदारांना सरकारनं त्यांची नुकसान भरपाई दिली. नागपूर मेट्रोतील दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती देत आहोत. नागपूर मेट्रोसाठी 3500 कोटी रुपये कर्ज घेतलं. 10 लाख नागपूरकरांना मेट्रोचा फायदा होणार आहे. चौफेर विकासकामं करण्यावर आमचा भर असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातील प्रत्येक घटक आणि माणसाला न्याय देण्याचं काम हे सरकार करणार आहे. 1000 लोकसंख्येतील गावात काँक्रीटचे रस्ते करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.
गड-किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना दंड - पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समूह विद्यापीठाचा कायदा तयार केला. राज्यात 3 नवीन विद्यापीठं तयार होत आहेत. क्लस्टर विद्यापीठाचा कायदा मंजूर करण्यात आला. गड-किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकार पुढाकार घेणार असून, गड-किल्ल्यावर कोण गैरवर्तन, दुर्गंधी किंवा घाण करणाऱ्यांवर दंड करण्यासाठी विधेयक आणणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कारागृह कायदा जुना होता. त्यात सुधारणा करण्यात आली. नवीन कायदा मंजूर करण्यात आला. बांबू लागवडीसाठी करार करण्यात आला. बांबू उत्पन्नातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतोय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित आहे. परभणी किंवा बीड प्रकरणात जो कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. हे सरकार कुणालाही सोडणार नाही. पोलीस जे दोषी असतील त्यांचा शोध घेतील. अवैधरित्या जे मुंबईत बांग्लादेशी राहात आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसंच नॅशनल लॉ स्कूलच्या नावात बदल करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.