अहमदनगर (शिर्डी) Shirdi Pav Wada Special Story : राहाता तालुक्यातल्या वाकडी येथील तरुण हा मोटार सायकलवरून थेट शेतीच्या बांधावर, वस्तीत आणि लोकांच्या दारोदारी जात पाववडा विकत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. पाहुयात "ई टीव्ही भारत"च्या स्पेशल रिपोर्टमध्ये या तरुणाची प्रेरणादायी कहाणी.
तरुणाची प्रेरणादायी कहाणी :आजचं युग हे डिजिटल युग बनलंय. प्रत्येकाकडं स्मार्टफोन असल्यामुळं ऑनलाईन म्हणजेच घरपोच खाद्यपदार्थांची विक्री वाढत आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थांची चव चाखायची असेल, तर गावातील चौकात जावं लागतं. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची हीच समस्या लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी गावातील हा तरुण आपल्या मोटार सायकलवरुन घरोघरी, गावोगावी जाऊन हातभट्टीच्या सहाय्यानं गरम पाववडा तयार करुन विकत आहे.
शेताच्या बांधापर्यंत जाऊन पाववडा विक्री : शिर्डीजवळ वाकडी हे छोटेसं गाव आहे. या गावातील सर्व घरं वाड्या- वस्तीवर विखुरलेली आहेत. याच गावात राहणारा राजेंद्र रसाळ हा तरुण पारंपरिक मातीकामाचा व्यवसाय करत होता. मात्र, जारच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्यानं त्याचा मातीकामाचा व्यवसाय अडचणीत आला. त्यामुळं कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा खेचायचा? असा पेच राजेंद्रसमोर होता. गावापासून दूर जाऊन व्यवसाय करायचा तर त्यासाठी दुकानाचं भाडं, मालासाठी लागणारं भांडवल कुठून आणायचं या चितेंत राजेंद्र होता. एकेदिवशी गावात पाववडा खाताना राजेंद्रला हाच पाववडा घरोघरी विकण्याची कल्पना सुचली. त्यानं आपल्या जुन्या मोटार सायकलला ब्रेकेट (बॉक्स) बनवून त्यावर हातभट्टी बसवली आणि थेट दारोदरी, वाड्या-वस्तीत आणि शेताच्या बांधापर्यंत जाऊन पाववडा विक्रीचा व्यवसाय त्यानं सुरू केला.