मुंबईOBC Morcha :मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानवर आंदोलन करण्याचं ठरवलं होतं. या मैदानात ते उपोषण करणार होते. मात्र, सरकारनं मराठा आरक्षणाची अधिसूचना काढून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यावर ओबीसी समाजानं नाराजी व्यक्त केलीय. याविरोधात आत ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी मुंबईत ओबीसींच्या धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे.
ओबीसीच्या आरक्षणावर अतिक्रमण :मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक मोर्चा काढला होता. मात्र, नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यावर मराठा आंदोलन स्थगित केल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. अधिसूचनेत सगेसोयरेची व्याख्या करण्यात आली आहे. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडतील, त्यांनाही कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्यावर ओबीसी नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी गावपातळीवरील सर्वेक्षणात उघड झालेली वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. गरीब ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मराठा समाज थेट अतिक्रमण करत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. त्यामुळं ओबीसी समाजात प्रचंड असंतोष आहे.
भुजबळांच्या अध्यक्षतेखाली धडक मोर्चा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेमुळं ओबीसी समाज कमालीचा दुखावला असून आंदोलनासाठी ओबीसी नेते एकवटले आहेत. मुंबईत ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, शक्तीप्रदर्शनाच्या जोरावर सरकार आरक्षण देत असेल, तर मुंबईतील धडक मोर्चातही आमची ताकद दिसून येईल. गेल्या 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानाची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळून लावलीय. मात्र, हजारो मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तळ ठोकून एक स्टेजही बांधला होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अशा स्थितीत मुंबईत आमचा धडक मोर्चात राज्यभरातून ओबीसी समाज एकत्र येणार आहे.