मुंबई Ram Mandir Pran Pratishtha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाही हे आता स्पष्ट झालंय. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येला भेट देणार आहेत. या भेटीचा तपशील मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.
अयोध्यानगरी सजली : भारतात सर्वत्र फक्त राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा होत आहे. अयोध्या येथील नव्यानं बांधलेल्या मंदिरात 22 जानेवारी म्हणजे सोमवारी रामाची मूर्ती विराजमान होणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनं या दिवशी अयोध्येतील मंदिरात भव्य सोहळ्याचं आयोजन केलंय. त्यासाठीची जय्यत तयारी पूर्ण झालीय. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.
मोदींच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा : या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते, कारसेवक, खेळाडू, कलाकार, संतांसह सात हजारांहून अधिक लोकांना या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलंय. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सोमवारी दुपारी 12.15 ते 12.45 दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे.
शिंदे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला जाणार नाहीत : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून ते दिग्गज बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी ट्रस्टनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण पाठवलं आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी 'X' वर याबाबत माहिती दिली आहे.
शिंदे मंत्रिमंडळासह जाणार अयोध्येला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'X'वर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, 'जय श्री राम! लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं करोडो भारतीयांचं, रामभक्तांचं तसंच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं आहे. त्याबद्दल मोदींचं आभार. अयोध्येत सोमवारी श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक होत आहे. या ऐतिहासिक, नेत्रदीपक कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.'
हे वाचलंत का :
- चित्रपटगृहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करा; मंत्री उदय सामंतांचं आवाहन
- राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
- राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, विधी विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली