नागपूर Nitin Gadkari Political journey : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रविवारी (9 जून) नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे मोदींच्या मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत. गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मागील पाच वर्षात गडकरी यांनी देशाचे वाहतूक मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नितीन गडकरी यांनी विद्यार्थी दशेत असताना कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर नितीन गडकरी यांनी अनेक चढउतार पाहिले. मात्र, सर्व संकटांवर मात करत त्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे.
गडकरींच्या कामाची जगभरात प्रशंसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ख्याती मिळवणारे नितीन गडकरी यांचा राजकीय प्रवास दिसतोय तसा अजिबात सोपा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला प्रावस आज केंद्रीय मंत्री पदापर्यंत येऊन पोहचलाय. या राजकीय प्रवासात नितीन गडकरी यांच्या कामाची जगभरात प्रशंसा होतोय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्यावर आरोप देखील झाले होते. मात्र आरोपांना न डगमगता त्यांनी उल्लेखनीय काम केलंय.
नितीन गडकरींचं शिक्षण :नितीन गडकरी यांच्यावर त्यांच्या आईनं केलेल्या संस्काराचा खूप प्रभाव आहे. आईनं त्यांच्यात सामाजिक कार्याची भावना रुजवली होती. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील हाच टर्निंग पॉइंट ठरला. त्यावेळी त्यांनी देशसेवेसाठी आपलं जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नितीन गडकरी हे उच्चशिक्षक आहेत.
स्वयंसेवक संघ ते राजकारणी : नितीन गडकरी यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा या गावात 27 मे 1957 रोजी झाला. बालपणीच त्याचं नातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलं होतं. महाविद्यालयात असताना भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाऊल टाकलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी 1979 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत सचिव झाले. त्यानंतर 1981 साली ते भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहराध्यक्ष झाले. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली.
पदवीधर मतदारसंघात गडकरींचा बोलबाला :1981 साली गडकरी भाजपा युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष झाले. मात्र, 1985 साली ते राजकारणात सक्रिय झाले. 1958 मध्ये त्यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघतून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. मात्र, त्यांना त्यात अपयशाचा सामना करावा लागला. राजकारणात आलेल्या पहिल्याच अपयशानं खचून न जाता त्यांनी नव्या जोमानं कामाला सुरवात केली. त्यांनी 1989 मध्ये त्यांना भाजपानं नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत राज्याच्या विधानपरिषदेत प्रवेश केला. त्यानंतर गडकरी आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ समीकरण झालं होतं. गडकरी हे सातत्यानं 1989,1996,2002 मध्ये विजयी झाले. 2002 मध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधातील सर्वांनी अर्ज मागं घेतल्यानं ते बिनविरोध निवडून आले होते.
राज्यात मंत्री म्हणून उल्लेखनीय काम :नितीन गडकरी राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. मंत्री असताना नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचे आजही दाखले दिले जातात. मुंबई-पुणे 'एक्सप्रेस-वे'ची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली. राज्यातील पहिला 'एक्सप्रेस'वे बांधण्याचा मान गडकरींना जातो. राज्य सरकारकडं विकास कामांसाठी मुबलक पैसा नसतानाही त्यांनी खासगीकरणातून कामे करण्याचा सपाटा लावला. नागपूर, मुंबईसह राज्यातील विविध भागात त्यांनी त्यावेळी शंभरहून अधिक उड्डाणपुलांची निर्मिती केली. त्यानंतर नितीन गडकरी यांना राज्यात 'पूलकरी','रोडकरी' या नावांनी ओळखलं जाऊ लागलं होतं. त्यांची तीच ओळख आजही कायम आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष :राज्याच्या राजकारणात पूर्णपणे रमलेले नितीन गडकरी यांची अचानक राष्ट्रीय राजकारण एन्ट्री झाली. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना 2009 साली नितीन गडकरींची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. कुशाभाऊ ठाकरे नंतर नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेले दुसरे मराठी नेते होते. गडकरींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वरदहस्त असल्यानं त्यांची थेट अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
केंद्रातील व्हिजनरी नेते म्हणून ओळख :नितीन गडकरी यांना देशातील दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून देखील ओळखलं जातं. नितीन गडकरी कायम नवनवीन प्रयोग राबवण्यासाठी आग्रही असतात. राज्यासह देशभर विकासाचे प्रकल्प राबविण्यासाठी गडकरी पीपीपी म्हणजे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)मॉडेलला पसंती देतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील 55 उड्डाणपूल विक्रमी वेळेत निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गडकरी हे एक शेतकरी नेते आहेत. त्यांनी जलव्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलंय. त्यांना जैव-इंधन, अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचीही आवड आहे.
'हे' वाचलंत का :
- मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राज्यातील 'हे' सहा शिलेदार, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द - Narendra Modi Oath Ceremony
- मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज, अजूनही फोनच्या प्रतीक्षेत - Ministerial Allotment
- 'पैलवान ते केंद्रात मंत्री', खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद कसं मिळवलं? - Murlidhar Mohol