मुंबई- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून आढावा बैठका घेण्यात येत आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी करण्याकरिता बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीच्या (SP) बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केलेलं कौतुक आणि जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी हे राजकीय चर्चेचा विषय ठरले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)ची गुरुवारी आढावा बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जयंत पाटील हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असल्यानं कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या राजीनामाची मागणी केली. यावर जयंत पाटील यांनी 8 दिवसांचा वेळ मागितला. निवडणूक काळात बूथ लेवलवर पक्षाला किती मतदान झालं, असं विचारत राजीनामा मागणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांनी आव्हान दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांना वेळ देणारा, त्यांचं म्हणणं ऐकून पक्ष मजबूत करणाऱ्याला प्रदेशाध्यक्ष करावे, अशी राष्ट्रवादीच्या (एसपी) पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील या तरुणांना संधी मिळावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तरुणांच्या हाती नेतृत्व सोपविल्याशिवाय पक्ष मजबूत होणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सोबतच, प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीची तारीखदेखील निश्चित करावी. त्या बैठकीला संबंधित जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती बंधनकारक करावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांकडं शरद पवारांकडे केली आहे.
आठ दिवसांमध्ये भाकरी परतणार?-शरद पवारांसमोरच कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं जयंत पाटीलदेखील काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांच्या मागणीवर जयंत पाटील यांनीदेखील कार्यकर्त्यांना आव्हान दिल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील म्हणाले की, "मी एकटा किती दिवस काम करणार? बोलणे खूप सोपं आहे. पण, चांगला माणूस मिळणं अवघड आहे. केवळ जोरदार आक्रमक भाषणांनी पक्ष चालवता येत नाही. येत्या दोन दिवसांत प्रत्येकानं आपल्या प्रभागात पक्षाला किती मतदान झालं? याची आकडेवारी द्यावी. यानंतर मी आठ दिवसांत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देईन."
- पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यावरून पक्षात मतभेद?राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी)चे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची राजकीय चर्चा सुरू असताना माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी नवीन लोकांना प्रमोशन दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील तीन वर्षे प्रदेशाध्यक्ष पदी राहतील, असा विश्वास व्यक्त केला त्यांना पाठिंबा दिला होता.