रत्नागिरी Vinayak Raut Taunt :भाजपाच्या नीतीचा प्रत्यय आता नारायण राणेंना आलेला आहे. जोपर्यंत वापर करायचा आहे, तोपर्यंत करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं. त्याच पद्धतीने नारायण राणेंना त्यांची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे. दुर्दैव एवढंच आहे की, अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्याला पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर ते भाजपाला शोभलं असतं अशी टीका शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. तसंच ज्या अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे दूर गेले होते, आता त्यांच्याच बरोबर नारायण राणे यांना काम करावं लागणार आहे, असा टोलाही खासदार राऊत यांनी यावेळी लगावला.
भाजपा ही भ्रष्टाचाऱ्यांसाठी लॉंड्री :जे-जे भष्टाचारी आहेत, त्यांनी भाजपाच्या लॉंड्रीमध्ये जायचं आणि स्वच्छ होऊन बाहेर यायचं हा सध्या चाललेला राजकीय धंदा आहे, अशी टीका देखील खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाबाबत ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काही वेगळा निर्णय देतील अशी अपेक्षा नाही. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ते आताही होईल, अशी देखील टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली.