मुंबईMumbai South Central Lok Sabha Results 2024 : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबईतून विजय संपादन केलाय. त्यांना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचं आव्हान होत. अनिल देसाई यांना 3 लाख 78 हजार 026 मते मिळाली आहेत. त्याचवेळी राहुल शेवाळे यांना 3 लाख 26 हजार 895 मते मिळाली आहेत. तब्बल 51 हजार मतांनी राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या (Mumbai South Central Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान होतं. कारण भाजपानं आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळं सलग दोनदा बहुमतानं विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत विरोधकांनी दणदणीत आघाडी घेतलीय.
कसा आहे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ? :संपूर्ण मुंबई शहर कामगार वर्गाचं असलं, तरी आज मुंबईच्या मध्य आणि पूर्व भागात कामगार वर्ग एकवटला आहे. त्यात प्रामुख्यानं चेंबूर तसंच धारावीचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मुंबई उपनगर जिल्ह्यातील अनुशक्तीनगर, चेंबूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात इतर विभागांप्रमाणे संमिश्र लोकसंख्या आहे. बहुतांश मतदारसंघात कष्टकरी, अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटांच्या नागरिकांचा समावेश आहे. या मतदारसंघात लोकसंख्येची घनताही जास्त आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे. मुंबई दक्षिण मध्य हा महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मुंबई उपनगरे आणि मुंबई शहर जिल्ह्यातील अनेक भागांचा यात समावेश आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी याच लोकसभा मतदारसंघात आहे. ही झोपडपट्टी सुमारे 520 एकरांवर पसरलेली आहे. तसंच 940 एकरांवर पसरलेली मुंबईची निवासी वसाहत, अनुशक्ती नगर, हे देखील इथं आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र, अणुऊर्जा विभागाच्या काही संस्थांची महत्वाची कार्यलय देखील या मतदारसंघात येतात.
राजकीय वर्चस्व कुणाचं? : विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2019 च्या निवडणुकीत अणुशक्ती मतदारसंघात राष्ट्रवादीचे नवाब मलिक विजयी झाले होते. या विधानसभेच्या पहिल्या अडीच वर्षांत ते मंत्रीही होते. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर मलिक यांनी अजित पवार गटात जाणं पसंत केलं होतं. त्यानंतर चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांनी विजय मिळवला होता. ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. सायन कोळीवाड्यात भाजपाचे के. तमिलसेल्वन विजयी झाले होते, तर वडाळ्यात विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेचे सदा सरवणकर हे माहीममधून विधानसभेवर गेले होते. ते सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळं या मतदार संघात महायुतीच पारडं जड असल्याचं दिसून येत होतं.
विजयाची माळ अनिल देसाई यांच्या गळ्यात :मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ भाजपा तसंच काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे. धारावीमध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी असल्यानं राजकीय पक्षांसाठी ही मोठी व्होट बँक आहे. धारावी मतदारसंघा हा मुंबई-दक्षिण मध्य लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो. हा मतदारसंघ अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे. या मतदारसंघात काँग्रेस तसंच शिवसेनेचं वर्चस्व आहे. 2009 पासून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे याच मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. धारावीत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे दोन तसंच राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आहेत. या भागात वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाजवादी पक्षाचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात होते. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा समाना झाला. त्यामुळं विजयाची माळ अनिल देसाई यांच्या गळ्यात पडली आहे.
निवडणुकीचा इतिहास : या लोकसभा मतदारसंघात 15 लाखांहून अधिक मतदार आहेत, सध्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे या मतदार संघाच लोकसभेत प्रतिनिधत्व करत आहेत. 1952 मध्ये काँग्रेसच्या जयश्री नैशाद रायजी यांनी येथे पहिली निवडणूक जिंकली होती. 1957 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे, 1962 मध्ये काँग्रेसचे विठ्ठल बाळकृष्ण गांधी, 1967 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे पुन्हा खासदार झाले होते. 1971 मध्ये काँग्रेसचे अब्दुल अब्दुल कादर सालेभाई, 1977 मध्ये जनता पक्षाचे बापू कांबळे, 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर. आर. भोळे विजयी झाले होते.
1984 मध्ये काँग्रेसची लाट असतानाही या मतदारसंघात गिरणी कामगारांचे नेते दत्ता सामंत अपक्ष म्हणून निवडून लोकसभेवर गेले होते. मात्र 1989 मध्ये वामनराव महाडिक यांच्या रूपानं हा मतदारसंघ शिवसेनेकडं गेला. त्यानंतर एखादा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिलाय. शिवसेनेचे मोहन रावले यांना 1991, 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 2009 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते. मात्र 2014 आणि 2019 च्या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव करून लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. विद्यामान खासदार राहुल शेवाळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.