मुंबई Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घरावर आणि अंतरवाली सराटी या गावात ड्रोनद्वारे टेहळणी केली जात आहे. त्यामुळं त्यांच्या जिवाला धोका असून याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत चौकशी करून अहवाल मागवला जाईल आणि मनोज जरांगे पाटील यांना योग्य सुरक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
अधिकचं पोलीस संरक्षण द्यावं : आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्यानं गावात भीतीचं वातावण निर्माण झालं आहे. त्यामुळं सरकारनं याबाबत निवेदन करून मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं अधिकचं पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली.
ड्रोन टेहळणीची चौकशी करणार : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करतंय? कशामुळं टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानानं दिला आहे. आंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. याचं सविस्तर निवेदन सरकारनं करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. याला उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं की, यासंदर्भात जालना पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागवला जाईल, ड्रोनद्वारे कोण टेहळणी करीत आहे याची चौकशी होईल आणि जरांगे पाटील यांना यापूर्वीच सुरक्षा देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल, असंही देसाई यांनी सांगितलं.
हेही वाचा
- विधिमंडळ समित्या का रखडल्या ; राजकीय पक्ष आहेत का जबाबदार ?, जाणून घ्या सविस्तर - Maharashtra Legislative Committees
- वर्षातून एकदाच वेलीवर येणाऱ्या 'या' फळाला आषाढी एकादशीत आहे महत्त्व, आरोग्याचे मिळतात आश्चर्यकारक फायदे - Ashadhi Ekadashi 2024
- अपक्ष उमदेवारानं बिघडविलं गणित, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय - MLC Polls 2024