मुंबई -बोरिवली पूर्व, वरळी आणि भायखळा येथील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर बांधकामाच्या ठिकाणांवरील निर्बंध उठवण्यापूर्वी पालिकेनं 24 तास निरीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घसरण होत असल्याने पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. या पार्श्वभूमीवर पालिकेने काही दिवसांपूर्वीच 77 बेकऱ्या आणि 286 बांधकामांना कामं थांबवण्याच्या नोटिसा जारी केल्या होत्या. यातील 77 बेकऱ्या बंद करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले होते. पालिकेच्या निर्णयानंतर बोरिवली, वरळी, भायखळा या भागातील हवेच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचे निदर्शनास आलंय. मात्र बांधकामांवरील निर्बंध उठवण्यापूर्वी या सर्व बांधकामांवर पुढील काही दिवस 24 तास वॉच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय.
बांधकामं ही इथल्या प्रदूषणाचे मुख्य कारण : मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर पावले उचलण्याची नोटीस बृहन्मुंबई महानगरपालिकेला काही दिवसांपूर्वी पाठवली होती. त्यानंतर पालिका प्रशासन सक्रिय झाले होते आणि प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना आणि बेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीय. वाहतूक कोंडी आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामं ही इथल्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहेत. आज मुंबईतील बांधकामांचा विचार केला, तर साधारण अब्जावधी रुपयांची बांधकामं सध्या मुंबईत सुरू आहेत. अशातच ज्या बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा पाठवण्यात आल्यात. त्या बांधकामांवर लक्ष ठेवणे हे सध्या पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.
प्रदूषणावर नियंत्रणासाठी आधीच 28 मार्गदर्शक सूचना :पालिका प्रशासनाने धूळ, धूर प्रदूषणावर नियंत्रणासाठी आधीच 28 मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. पालिकेच्या पर्यावरण आणि वातावरण याबद्दल विभागाकडून सातत्याने या बांधकामांचा पाठपुरावा केला जातोय. पालिकेकडून सर्व प्रकारच्या प्रकल्प आणि बांधकामाच्या विकासक आणि कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना सादर करण्याच्या सूचना केल्यात. शिवाय जे कंत्राटदार आणि बिल्डर या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना आधी सूचना, मग कारणे दाखवा नोटीस आणि शेवटी काम थांबवण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्यात. नोव्हेंबर 2024 पासून 856 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस तर 462 बांधकामांना बांधकाम थांबवण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय.
आज हजारो कोटी टन कचरा पडून : वरळी येथील कोस्टल रोड प्रोजेक्ट साइट आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी प्रदूषण आणि धूळ-शमन मार्गदर्शक तत्त्वांमधील त्रुटींबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिका आणि एमएमआरडीएला नोटीस बजावल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिलीय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती कदम यांनी दिलीय. यासोबतच देवनार डंपिंग ग्राऊंड आज पालिकेने बंद जरी केले असले तरी तिथे आज हजारो कोटी टन कचरा पडून आहे. या डंपिंग ग्राउंडचा विस्तार करण्याबाबत आणि या कचऱ्यावर पालिका काय प्रक्रिया करणार आहे, त्यासाठी पालिकेकडे काय प्लॅन आहे याची माहितीदेखील प्रशासनाकडून मागवण्यात आल्याचं सिद्धेश कदम यांनी सांगितलं.
बांधकामांवर 24 तास लक्ष ठेवणार :महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हस्तक्षेपानंतर आता मुंबईतील अब्जावधी रुपयांच्या बांधकामांवर 24 तास लक्ष ठेवणे हा पालिकेसमोर मोठा टास्क असून, देवनार डंपिंग ग्राऊंडबाबत देखील लवकरात लवकर ॲक्शन प्लॅन करणे पालिकेसमोर आव्हान आहे. या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, सातत्याने सर्व भागातील हवेच्या दर्जाचे निरीक्षण सुरू आहे. ज्या परिसरात हवेचा दर्जा वाईट आहे, तिथे आवश्यक तपासणी करून उपाययोजना करण्याची सूचना तातडीने दिल्या जात आहेत. मात्र, जिथे नियमांचे पालन होणार नाही तिथे सक्त कारवाई केली जाणार आहे. शासकीय आणि खासगी प्रकल्पांमध्ये कारवाई करताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असंसुद्धा आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलंय.
मुंबईतील प्रदूषण करणाऱ्या बांधकामांवर पालिका ठेवणार 24 तास वॉच - MUMBAI MUNICIPAL CORPORATION
बोरिवली, वरळी, भायखळा या भागातील हवेच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचे निदर्शनास आलंय. त्यामुळे सर्व बांधकामांवर पुढील काही दिवस 24 तास वॉच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय.
मुंबई महापालिका (Source- ETV Bharat)
Published : Jan 4, 2025, 2:50 PM IST