महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुसाट मुंबई...! कोस्टल रोडचा 'हा' मार्ग उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत - Coastal Road - COASTAL ROAD

Mumbai Coastal Road : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा तिसरा टप्पा उद्या सकाळी 7 वाजता खुला करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.

mumbai coastal road
मुंबई कोस्टल रोड (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 9:10 PM IST

मुंबई Mumbai Coastal Road : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म 8 लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल उद्या सकाळी 7 वाजेपासून तात्पुरत्या स्वरुपात खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर कोस्टल रोडचा हा भाग खुला करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे.

आठवड्यातून पाच दिवस राहणार मार्ग खुला : कोस्टल रोड प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा तिसरा टप्पा उद्या सकाळी 7 वाजता खुला करण्यात येणार आहे. हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. तर प्रकल्पातील उर्वरित कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा टप्पा बंद राहील. वांद्रे-वरळी सी लिंक पर्यंत जाण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरुपाचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेनं जाणाऱ्या साधारण साडेतीन किलोमीटर मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून, नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात उद्या सकाळी 7 वाजेपासून ही मार्गिका खुली करण्यात येत आहे. सदर मार्गिकेवरुन पुढं जावून फक्त सागरी सेतूकडं जाता येईल. वरळी आणि प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्ग तसंच खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा.

91 टक्के काम पूर्ण : मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. प्रकल्पातील विविध टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत तसतसे ते वाहतुकीसाठी खुले करुन दिले जात आहेत. त्यामुळं एकाच वेळी प्रकल्पाचं काम होत असताना वाहतुकीला देखील वेग मिळतोय. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पापैकी 91 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सी लिंक) टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचं आजतागायत 91 टक्के काम पूर्ण झालं आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी फुटपाथ आदी कामं अंतिम टप्प्यात आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी व वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी प्रकल्पामधील पूर्ण झालेले टप्पे एका पाठोपाठ खुले करण्यात येत असल्याचं पालिका प्रशासनानं म्हटलंय.

आतापर्यंत किती मार्ग प्रवासासाठी खुला : सर्वात आधी 11 मार्च 2024 रोजी दक्षिणेला प्रवासाची सुविधा देणारी बिंदूमाधव ठाकरे चौक वरळी ते मरीन ड्राईव्ह ही साडेनऊ किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका खुली करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर दिशेनं प्रवासाची सुविधा देण्यासाठी 10 जून 2024 रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोट्स जंक्शनपर्यंत सुमारे साडेसहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला होता. आता हाजी अलीपासून पुढं खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत सुमारे साडेतीन किलोमीटरचा तिसरा टप्पा तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांच्या सोयीसाठी खुला करण्यात येत आहे. उत्तरेकडे प्रवासासाठी मरीन ड्राईव्ह ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा एकूण 9.75 किलोमीटरचा टप्पा उपलब्ध होणार आहे. खान अब्दुल गफार खान मार्गावर प्रवेश केल्यानंतर तेथून पुढं वरळी-वांद्रे सी लिंकवर प्रवेश करणं शक्य होणार आहे. त्यामुळं आता मरीन ड्राईव्हवरुन थेट सागरी सेतूपर्यंत जलद प्रवास करता येणार आहे. मात्र, तुम्हाला जर वरळी किंवा प्रभादेवी परिसरात जायचं असेल तर डॉ अ‍ॅनी बेझंट मार्गाचाच वापर करावा लागणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली आहे.

हेही वाचा :

  1. आदित्य ठाकरे यांची कोस्टल रोड प्रकरणात चौकशी करा - आशिष शेलार यांची मागणी - Coastal Road case
  2. १४ हजार कोटींच्या कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच गळती, सुरक्षेच्या प्रश्नावर पालिका प्रशासनानं काय म्हटलंय? - Mumbai Coastal Road

ABOUT THE AUTHOR

...view details