मुंबई Mumbai Accident : लालबागजवळ पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या जोरदार धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. तर अन्य एक जण जखमी झाला. त्यानंतर अपघातासाठी जबाबदार असलेल्या कार चालकाला पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील कारचालक आरोपीला अटक केली असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक : या प्रकरणी विठ्ठल कदम यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार दिलीय. त्यांनी काळाचौकी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "ते आपले मित्र पांडुरंग मातारे यांच्यासह काळाचौकी येथील हुतात्मा भगतसिंग मैदानावर नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला जात होते. मात्र, 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत मैदानावर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमामुळं त्यांना दैनंदिन चालण्यासाठी दुसरीकडं जावं लागलं आणि मार्ग बदलावा लागला. अपघाताच्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास कदम आणि मातारे हे दोघे पायी जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडनं परळच्या दिशेनं जात असताना परळहून भायखळ्याच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या एका वाहनानं त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यामुळं हे दोन्ही पादचारी जखमी झाले. काही वेळानं शुद्धीवर आल्यानंतर कदम यांना काही अंतरावर मातारे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. तर त्यांना धडकलेली कार अन्य वाहनावर आदळलेली दिसली."