अमरावती Bus Accident In Melghat: रोजगाराच्या निमित्तानं जिल्ह्यात आणि परराज्यात स्थलांतर केलेले आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणांत होळीच्या (Holi 2024) सणासाठी गावी येत आहेत. गेल्या चार दिवसापासून या गर्दीमध्ये वाढ झालीय. मेळघाटातील परतवाडा ते सेमाडोह दरम्यान एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात, दोन महिलांचा मृत्यू झालाय. ललिता चिमोटे, इंदू गंत्रे असे मृत्यू माहिलेची नावे आहेत. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ही बस खाई मधून रात्री आठ वाजता तीन जेसीपीच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. या अपघातामुळं परतवाडा ते सेमाडोह मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. बसमध्ये एकूण 65 प्रवासी होते त्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
एक मृतदेह बसमध्ये तर दुसरा दरीत : परतवाडा कडून धारणीकडं जाणारी बस घाट वळणावर थेट दरीत जाऊन कोसळली. अपघात होताच एक महिला थेट बसच्या काचा तोडून बाहेर निघाली तर दुसरी चालकाच्या केबिनमध्ये जोरदार धडकून जागीच ठार झाली. ही बस बाहेर काढण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून तीन जेसीबीच्या साह्याने प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता ही बस खाईतून बऱ्यापैकी वर आली असताना, एका महिलेचा मृतदेह बसच्या बाहेर खायच्या दिशेने लटकला होता. तर बस बाहेर काढत असताना बस बाहेर लटकलेल्या महिलेचा मृतदेह खाली दरीत कोसळला. रात्री आठ वाजता ही बस बाहेर काढण्यात आली. त्यावेळी एका महिलेचा मृतदेह बसमध्ये होता, तर दुसरा दरीमध्ये कोसळलेला होता. पोलिसांनी मृतदेह रात्रीच्या अंधारात बाहेर काढला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. जंगलामध्ये झालेली गर्दी पोलिसांनी नियंत्रित केली. थांबलेल्या वाहनांमधील अनेक जण उंच पहाडावर चढून नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करीत होते, यावेळी पोलिसांनी त्यांना खाली उतरवलं. पोलीस उपनिरीक्षक अतुल नवगिरे यांच्यासह चार पोलीस निरीक्षक पदरा पोलीस आणि वीस होमगार्ड अपघात स्थळी तैनात होते.