मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आरोपी मिहिर शाहचा अल्कोहोल अहवाल निगेटिव्ह आला आहे. वरळी परिसरातील अट्रिया मॉलसमोर रविवारी 7 जुलै रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला होता. या अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शाह नंतर विरार फाटा येथून अटक करण्यात आली होती. वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता. तसंच त्यानं मद्याचं सेवन केल्याचा आरोप होता. त्यानंतर मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल आज वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली.
अपघातानंतर मिहीर शहा फरार : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला 16 जुलै रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सर्व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयानं मिहीर शाहला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 7 जुलै (रविवार) पहाटे वरळी परिसरात मिहीर शाहनं बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवत एका जोडप्याला चिरडलं होतं. या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता तर, प्रदीप नाखवा जखमी झाले होते. हे दोघेही वरळी येथील रहिवासी आहेत. या घटनेनंतर मिहीर शाह फरार झाला होता.