छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - समाजातील विकृती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचं अलिकडे सारखं दिसून येत आहे. त्यात येथील जिन्सी परिसरात औषध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला जवळच्याच मेडिकल चालकानं अश्लील चित्र रेखाटून दाखवत विकृतपणा केल्याचा आरोप संबंधित मुलीनं केला आहे. मुलगी घरी गेल्यावर तिनं आईला सगळा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने दुकानाकडे धाव घेत दुकानदाराला बेदम चोप दिला. पोलिसात तक्रार होत असताना गर्दीचा फायदा घेत आरोपी पळून गेला असून त्याचा तपास पोलीस घेत आहेत.
औषधी दुकानदाराने केले विकृत चाळे - जिन्सी परिसरात ही संतापजनक घटना घडली. 9 वर्षांची मुलगी रात्री औषध आणण्यासाठी जवळच असलेल्या मेडिकलमध्ये गेली होती. त्यावेळी औषध देण्याच्या बहाण्याने दुकानदारानं मुलीला जवळ बोलावलं आणि गप्पा मारण्याचं नाटक करत तिथं असलेल्या एका पुठ्ठ्यावर अश्लील चित्र काढून दाखवलं. हे करत असताना तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या मुलीनं औषध देण्याची मागणी केली त्यावेळी आरोपीनं आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. काही वेळानं औषध घेऊन ती तिथून निघून गेली. घरी गेल्यावर तिनं घडलेला प्रकार आईला सांगितला. कुटुंबीयांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी मेडिकलकडे धाव घेतली.