महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुजबळांचं तलवारी घासून ठेवण्याचं आवाहन, तर आम्हीही शांत बसणार नाही असा जरांगेंचा इशारा - Manoj Jarange Patil PC

Manoj Jarange Patil PC : मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गंजलेल्या तलवारी घासून ठेवा असं आवाहन उपस्थितांना केलं होतं. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असं म्हटलय. मात्र आम्ही शांत देखील बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Manoj Jarange Patil PC
छगन भुजबळ (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 5:43 PM IST

Updated : Jun 24, 2024, 9:00 PM IST

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil PC: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्याच्या कार्यक्रमात गंजलेल्या तलवारी घासून ठेवा असं म्हटलं. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. आम्ही सुरुवात करणार नाही; मात्र आम्ही शांत देखील बसणार नाही. प्रत्युत्तर आम्ही नक्की देऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. छगन भुजबळ यांना मुद्दाम जातिवाद घडवून आणायचा आहे. त्यामुळेच काही ठिकाणी मराठा नेत्यांना प्रवेश बंदी असे बॅनर त्यांनी लावायला लावले. आम्ही असा जातीवाद कधीच केला नाही; मात्र आता तसं घडतंय. त्यामुळे आम्ही देखील असं करू शकतो असं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलं. शंभूराज देसाई यांनी 13 तारखेपर्यंत शांत राहा असं सांगितलं. म्हणजे आम्हाला आमच्या नऊ मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे असं देखील ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील मराठ्यांना तयारीचे आवाहन करताना (ETV Bharat Reporter)

छगन भुजबळ जातिवाद घडवत आहेत :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन उभं केलं. त्यात अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली; मात्र त्यात कोणत्याही जातीचा उल्लेख नव्हता, नेता हा नेतात असतो. त्यामुळे त्यांना आम्ही बंदी घातली होती; परंतु आता नुकतंच समोर आलय की काही गावात मराठा नेत्यांना प्रवेशबंदी असा बॅनर लावण्यात आला आहे. हे बॅनर छगन भुजबळ यांनीच लावायला सांगितले असून, त्यांना या राज्यात जातिवाद घडवायचा आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. विखे पाटील साहेब म्हणतात की, आंदोलनाची दिशा भरकटली आहे; पण त्यांनी आता या गावांमध्ये जाऊन दाखवावं. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना विखे पाटील तुम्ही मंत्री होतात. तुमच्याच काळात कुणबी, मराठा एकच असल्याचा कायदा करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. तुमच्याच भागातील ओबीसी नेते एकत्र आले असून तुम्ही मराठ्यांसोबत कधी राहणार असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

भुजबळांनी मराठ्यांचं आरक्षण मान्य करावं :आम्ही ५० टक्के हून अधिक आहोत. नक्की उत्तर देऊ राज्यासाठी ही गंभीर बाब आहे. आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा अभ्यास नाही अशी टीका केली होती. त्यावर अभ्यास तुम्हालाच नाही. तुम्हीच खोटं पसरवता. लोक आता तुमचं ऐकत नाहीत, तर फक्त माझं ऐकतात. पाशा पटेल मला भेटले होते. त्यावेळी माझ्या आंदोलनामुळे त्यांना कुणबीचा दाखला मिळाला असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आता नोंदी सापडत आहेत. भुजबळांनी आमचं आरक्षण मान्य करावं. विनाकारण या वयात इतक्या मोठ्या समाजाचा रोष अंगावर ओढवून घेऊ नये, असा सल्ला यावेळी दिला. १३ तारखेपर्यंत शांत राहू. तोपर्यंत कोणालाही उत्तर देणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास आम्हाला आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

मला एकटे पाडले :आम्ही खोटं कधी बोलत नाही. सरकार दरबारी पुरावे आहेत. त्यामुळे सत्यता बाहेर आली. मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांचे रंग आता उघडे पडत आहेत. मराठ्यांच्या नेत्यांनी त्याचा विचार करावा. ओबीसी नेते आरक्षणाचा विचार करतात मतांचा नाही; मात्र मराठे हे मतांचा विचार करतात. मागच्या दहा दिवसात सगळे ओबीसी नेते एकत्र आले. पक्ष विसरून सर्व एका ठिकाणी आले. मराठ्यांना हे समजत नाही का, असा प्रश्न आहे. मला एकटं पाडलं जातय. सगळीकडून मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा नेत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळेच ६ जुलै ते १३ जुलै या काळात शांतता जनजागृती रॅली आम्ही आयोजित केली असून या कार्यक्रमात मराठा समाजाच्या सर्व नेत्यांनी आणि लोकांनी एकत्र आलं पाहिजे. कुठल्याही कार्यक्रमांना न जाता शांतता जनजागृती रॅलीत सहभाग घेतला पाहिजे, मी एकटा जरी असलो तरी हटणार नाही. मेलो तरी चालेल; मात्र मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊन राहीन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

हेही वाचा:

  1. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती? विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग आणि ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता - Shivsena UBT vs EC
  2. महिला बँक मॅनेजरला भामट्यानं केलं डिजिटल अटक; 17 लाखाला घातला गंडा - Bank Manager Digital Arrest
  3. "ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News
Last Updated : Jun 24, 2024, 9:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details