छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange vs Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं मोठं राजकारण तापलं आहे. त्यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात बोलताना हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस मराठा समाजाविषयी खुनशीपणा का करतात? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. "देवेंद्र फडणवीस यांनाच राज्य बेचिराख करण्याची इच्छा होती. आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर आद्यापही ठाम आहोत," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आमच्यामुळेच आज राज्यात शांतता आहे :"आम्ही मुंबईकडं निघालो असताना, जर वेळीच परतलो नसतो, तर मात्र परिस्थिती बिघडली असती. आमच्यामुळेच आज राज्यात शांतता आहे. गरज नसताना संचारबंदी का लावली? तिथं काय अशी परिस्थिती होती, की तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. तुम्ही राज्य चालवायला निघालात, मात्र आम्ही काय गडबड केली. त्यामुळे तुम्ही अशी पावलं उचललीत," असा संतप्त प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांनी बंदुकीचा फोटो का टाकला :"आमच्या आंदोलनात आम्ही आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काहीही बोललो नाही. मात्र आता त्यांनी चूक केली तर, आम्ही बोलणारच आहोत. त्यांनी हातात बंदूक घेतलेला फोटो आपल्या सोशल मीडियावर का टाकला? त्याचा संदर्भ वेगळा असला तरी, आताच टाकल्यामुळे त्याचा रोख मराठा समाजाकडं आहे. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाविषयी खुनशीपणा ठेवलाय असंच दिसतंय. त्यांनी संचारबंदी का लावली? तिथं काय परिस्थिती होती? त्यांनी हे सांगावं. आम्ही शांततेत आंदोलन केलं काहीच गडबड झाली नाही. तरी राज्यभर आमच्यावर गुन्हे का दाखल केले? एका रात्रीत सर्वच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह विभागाने का दिले हे त्यांनी सांगितलं पाहिजे. मराठा समाजाने घाबरू नये, त्यांना जितके गुन्हे दाखल करायचे करून द्या. आपण न्यायालयात जाऊ, आपल्याला तिथे नक्की न्याय मिळेल. मराठा समाजाच्या वकिलांनी आता तयार राहावं, ज्या मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होतील, त्यांचा जामीन घेऊन मोफत खटला लढावा, अशी विनंती वकिलांना करत आहोत," असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
आंदोलन सुरूच राहणार :"तिकडं अधिवेशन सुरू असल्यामुळे ते आता येणार नाहीत, मग आम्ही कशाला आंदोलन सुरू ठेवावं. त्यासाठी आम्ही ते आंदोलन आता बंद केलं आहे. मात्र मराठा समाजानं आपापल्या पद्धतीनं आंदोलनात सहभागी व्हायचं असून यापुढं धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण हे मात्र सुरू ठेवायचे आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अशा पद्धतीचे आंदोलनं करायची आहेत. अंतरवाली सराटी इथं संचारबंदी लावून तिथे आंदोलकांना भेटण्यावर निर्बंध घालण्यात आले. मात्र आता तुम्ही येऊ नका मी तुमच्याकडे येणार आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपण कुठंही जाऊ शकतो. आपल्या जाण्यावर निर्बंध लावू शकत नाही. त्यामुळे आता मी तुमच्याकडं येईन," असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाचे नेते काय सांगणार :"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन तळागाळात आपण मराठा समाजाच्या सोबत आहोत असा संदेश द्या असं सांगितलं. मात्र मागील अनेक वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या मराठा समाजाला तुम्ही काय दिलं? याबाबत तुम्ही काय सांगणार, असा प्रश्न उपस्थित होतोय. आज मराठा आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते यांना नाइलाजास्तव पक्षाची बाजू घ्यावी लागणार आहे. त्यांनी खरंतर समाजाची बाजू घ्यायला पाहिजे, मात्र ते आपल्या नेत्याची बाजू घेत आहेत. मी फक्त आणि फक्त समाजाची बाजू घेऊन लढत आहे. त्यांनी देखील आपल्या नेत्यांना समाजाविषयी सांगणं अपेक्षित आहे. मात्र तसं न करता ते आपल्या पक्षासाठी आणि नेत्यासाठी काम करतात," अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी केली.
आशिष शेलार यांची प्रतिमा चांगली, त्यांनी काही बोलू नये :भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री असलेल्या आशिष शेलार यांनी अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली. त्यावर जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं. "आशिष शेलार यांच्याकडून अशी अपेक्षा नाही, तुमची प्रतिमा खूप चांगली आहे. त्यामुळे तुम्ही यावर बोलू नये. राज्य बेचिराख कोणाला करायचं होतं हे समजून घ्या, असं झालं असतं तर सत्तेतून राज्य ते केंद्रापर्यंत सगळं संपलं असतं. आम्ही आमच्या परीनं लढणार आहोत. आशिष शेलार हे खूप धाडसी आहेत. ते राज्यमंत्री असल्यापासून आम्ही त्यांना ओळखतो. मुंबईत अशी प्रतिमा असायला धाडस लागतं. त्यामुळे त्यांनी या विषयात बोलू नये," असं म्हणत जरांगे पाटील यांनी आशिष शेलारांचं कौतुक करत आरक्षणाच्या मुद्द्यावर न बोलण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा :
- देवेंद्र फडणवीसांवरील आरोप भोवणार ? : मनोज जरांगे यांच्याविरोधात एसआयटी करणार चौकशी
- मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी शोधून काढणार; देवेंद्र फडणवीस आक्रमक