छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Raju Shetti News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली मोठ्या वेगानं घडत आहेत. "शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं कुणीही लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं. परंतु सर्वसामान्यांचा या आघाड्यांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे 'परिवर्तन आघाडी' तयार करण्यात आली," अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे बैठक: माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले "दोन्ही आघाड्यांच्या भांडणात शेतकऱ्यांचा विचार कुणीही करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र काम करणाऱ्याा चळवळीतील संघटना एकत्र आल्या आहेत. एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळा पर्याय लोकांना देणार आहोत. सत्तेत असलेल्या लोकांना शेतकऱ्यांशी देणं-घेणं राहिलं नाही. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जिव्हाळा निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांना समोर ठेवून निवडणूक लढली पाहिजे. त्यामुळे छोट्या समविचारी संघटना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. त्यासाठी 24 ऑगस्ट रोजी शेगाव येथे महत्त्वाची बैठक घेणार आहोत. त्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी संघटना, बी. आर.एस. आणि शेतकरी संघटना अशा छोट्या घटकांना एकत्र घेणार आहोत."
अनेकांशी बोलणी झाली:परिवर्तन आघाडीत कोण येणार? याबाबत राजू शेट्टी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,"आम्ही आमचं काम करत असून चळवळ सोडली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये 288 जागा लढवणार आहोत. या आघाडीत मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा झाली आहे. समविचारी असलेले घटक आम्ही सोबत घेणार आहोत. बच्चू कडू यांनी आमच्यासोबत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते आले तर त्यांचा स्वागतच आहे. आमची दोन वेळा बैठकदेखील झाली आहेत. भविष्यात ते आमच्यासोबत येऊ शकतात. तर रविकांत तुपकर जरी आले तरी त्यांचं स्वागत असेल. ते आमचे शत्रू नाहीत."