महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बटेंगे तो कटेंगे अन् व्होट जिहादला महाराष्ट्रात स्थान नाही; माजी खासदार राज बब्बर यांची टीका

राज बब्बर यांनी भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे, व्होट जिहादवर टीका केलीय, सामाजिक सौहार्द धोक्यात आणण्याचे काम करण्याचे प्रयत्न करीत असल्याचंही त्यांनी टीका केलीय.

Former MP Raj Babbar
माजी खासदार राज बब्बर (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

मुंबई -राज्यातील सामाजिक सौहार्द धोक्यात आणण्यासाठी बाहेरून आलेल्यांनी पुष्कळ प्रयत्न केलेत. मात्र राज्यातील जनता त्यांच्या या मनसुब्यांना बळी पडणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राज बब्बर यांनी व्यक्त केलाय. बटेंगे तो कटेंगे आणि व्होट जिहाद यांसारख्या घोषणांना पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात अजिबात संधी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. दोन समाजात, दोन धर्मात वाद लावण्याच्या भाषेला आपण कधीही समर्थन करत नाही, अशा प्रचाराला जनता पाठिंबा देणार नाही. महाराष्ट्राच्या मातीने देशभरातील नागरिकांच्या स्वप्नांना बळ दिले आणि त्यांची स्वप्ने पूर्ण केलीत. देशातील अनेक नागरिक महाराष्ट्रात मुंबईत येताना अनेक स्वप्ने घेऊन येतात, ते सोबत बाकी काही आणत नाहीत, मुंबईत राज्यात त्यांची स्वप्ने पूर्ण होतात. मात्र आता ऐन निवडणुकीत धर्माच्या, जातीच्या नावावर भेद करणे चुकीचे आहे, असं राज बब्बर म्हणालेत.

पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौऱ्यावर :भाजपाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने मोठा फटका दिलाय. लोकसभा निवडणुकीत ज्यांना आपल्या उत्तर प्रदेशात काही करता आले नाही, ते इथे येऊन बटेंगे तो कटेंगेची घोषणा करीत आहेत, हे दुर्दैवी असल्याचं राज बब्बर म्हणालेत. काही बुद्धिमान नेत्यांना या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आला, त्यामुळे ते आधीच परदेश दौऱ्यावर निघून गेले, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावलाय. महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंबहुना त्यापूर्वीपासून एक आहे. त्यांच्यावर या घोषणेचा फरक पडत नसल्याने मोदी विदेशात निघून गेलेत, धर्माच्या आधारावर विभागणी महाराष्ट्रात चालणार नाही, हे लक्षात आल्याने पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौऱ्यावर पळालेत, असा आरोप त्यांनी केलाय.

महायुतीचादेखील विरोध : बटेंगे तो कटेंगे याला महायुतीमधील घटक पक्षांनीदेखील विरोध केलाय. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, काँग्रेसमधून भाजपात गेलेले खासदार अशोक चव्हाण, भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी या घोषणेला विरोध केलाय, त्यामुळे महायुतीमध्ये आणि भाजपामध्येच या घोषणेला पाठिंबा मिळाला नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. बटेंगे तो कटेंगेची घोषणा आणणाऱ्यांनी विभाजित करणारे आणि कापणारेदेखील तेच आहेत हे विसरू नये, अशी टीका त्यांनी केलीय. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे प्रकार चालू शकत नाहीत, जनतेला हे स्वीकारार्ह नाही, असे बब्बर यांनी स्पष्ट केलंय.

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच : सत्ता परत येण्याची शक्यता नसतानाही महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे, तर सत्ता येणार याची खात्री असलेल्या मविआमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नसल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सोमय्यांना त्यांच्या भाजपामध्येदेखील कोणीही गंभीरतेने घेत नाही, त्यामुळे आपण त्यांच्यावर बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असे बब्बर यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील जनतेने या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवावा आणि मविआच्या पाठीशी उभे राहून मविआचे सरकार आणावे, असे आवाहन राज बब्बर यांनी केलंय. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, डॉ. चयनिका उनियाल, माजी आमदार चरणजित सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, प्रवक्ते निजामुद्दीन राईन उपस्थित होते.

हेही वाचा...

  1. महालक्ष्मी योजनेतून महिलांना देणार 3 हजार, एसटी प्रवासही करणार मोफत; राहुल गांधींनी दिलं आश्वासन
  2. राहुल गांधींनी दिली अचानक नांदेडच्या बसस्थानकात भेट, रस पीत नागरिकांशी साधला संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details