मुंबई Lok Sabha Election Results 2024:महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अत्यंत आनंद व्यक्त केला. राज्यातील जनतेनं तोडाफोडीच्या आणि जातीपातीच्या राजकारणाला दिलेली ही चपराक आहे. राज्यातील जनता ही नेहमीच विकासाच्या आणि निष्ठेच्या बाजूने होती हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले.
बच्चा अभी बडा हो गया है :निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही नेत्यांनी आपल्यावर जोरदार टीका केली होती. याला लवकर नेता व्हायचं आहे पण अजून तो बच्चा आहे अशा शब्दात टीका झाली त्या सर्वांना आता मला उत्तर द्यायचं आहे की बच्चा अभी बडा हो गया है. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खूप चांगल्या पद्धतीने तसंच महाविकास आघाडीनं यश मिळवलं आहे. आम्ही अत्यंत कमी जागा स्वीकारून चांगल्या जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा जास्तीत जास्त जागांवर दावा राहणार आहे आणि त्या जागा आम्हाला मिळतील अशी आम्हाला खात्री आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांशी चर्चा करून आम्ही या जागा घेऊ आणि लढवू असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.
त्यांना परत घेण्याबाबत योग्य विचार :आमच्या पक्षातून फुटून काही आमदार किंवा नेते जे बाहेर गेले, त्यापैकी अनेकजण परतण्याच्या वाटेवर आहेत. मात्र जे केवळ चुकून अथवा नाईलाजाने गेले त्यांच्याबाबत विचार व्हावा. मात्र ज्यांनी पक्षातून बाहेर केल्यानंतर पक्षावर जोरदार टीका केली आणि आमच्या जागा निवडून येऊ नयेत यासाठी खूप प्रयत्न केले अशा लोकांना परत घेण्याबाबत मात्र पक्षाने योग्य तो विचार करावा अशी मी पक्षाला कार्यकर्ता म्हणून विनंती करीन असंही पवार यावेळी म्हणाले.
देशातील समीकरण वेगळे असेल :देशात सध्या इंडिया आघाडीला खूप चांगल्या पद्धतीच्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं येत्या दोन दिवसात राजकारणाची वेगळी चित्रं फिरतील आणि तुम्हाला देशात वेगळं समीकरण पाहायला मिळेल. निश्चितच हे इंडिया आघाडीसाठी दिलासादायक चित्र असेल असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
- मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का; दक्षिण-मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी - Lok Sabha election results 2024
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक; नारायण राणेंना मोठी आघाडी - Lok Sabha Election Results 2024
- हवेत विरला एनडीएचा ४०० पारचा नारा, महाराष्ट्रासह उत्तप्रदेशमध्ये पिछाडी - Lok Sabha election results 2024