सातारा Satara Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी महायुतीचे उमेदवार उदयन राजे भोसले यांनी आज सकाळीच आपल्या कुटुंबीयांसह 07.07 वाजता मतदानाचा हक्क बजावला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी ल्हासुर्णे इथं मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि त्यांच्या पत्नी अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी मतदानाचा हक्क बजावला.
उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरूवात झाली. सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. या लढतीकडं राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.
जिल्ह्यात 100 युनिक मतदान केंद्र :भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी देखील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावात मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण सातारा जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली. ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी दिसत आहे. दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात 100 युनिक मतदान केंद्र बनवली आहेत. या आकर्षक मतदान केंद्रांमध्ये मतदार मतदानानंतर सेल्फी घेत आहेत. साताऱ्यातील गोडोली उपनगरातील बांबूची सजावट करण्यात आलेलं मतदान केंद्र लक्षवेधी ठरतंय.