अमरावतीMahua Flowers In Melghat : सातपुडा रांगेत वसलेला मेळघाट हा उंच पहाड, दरी, घनदाट जंगल, वाघ, अस्वल असे प्राणी आणि आदिवासी समुदायाच्या विविध परंपरा यांनी नटलेला असतानाच मेळघाटातील 'सिड्डू' ही देखील विशेष प्रसिद्ध आहे. कोरकू भाषेतील 'सिड्डू' या शब्दाचा अर्थ दारू असा होतो. ही सिड्डू मोहाच्या फुलांपासून तयार केली जाते. सध्या वसंत ऋतूत मेळघाटात मोह बहरला असून उंच झाडावरून जमिनीवर पडणारे हे मोह फूल वेचण्यासाठी झाडाखाली आधी आग लावली जाते. मोहफूल (Maha Flower) वेचण्याच्या या आगळ्यावेगळ्या परंपरे संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं खास आढावा घेतला आहे.
पहाटे कोसळतो मोह फुलांचा पाऊस: संपूर्ण मेळघाटात मोहाची एकूण 25 ते 30 हजार झाडं आहेत. सध्या वसंत ऋतूत मोहाची झाडं फुलांनी बहरली आहेत. मोहाची फुलं खाण्यासाठी माकडांची टोळी या झाडांवर सध्या मुक्काम ठोकूनच असते. मोहाच्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुलं पहाटे तीनच्या सुमारास उगवतात आणि पहाटे चारच्या दरम्यान ही फूलं झाडावरून गळून खाली पडतात. पहाटेच्या वेळी मोहाच्या झाडाखाली जणू फूलांचा पाऊसच कोसळतो असा अनुभव येतो.
आग लावण्याचं असं आहे कारण : मेळघाटातील आदिवासी बांधव अनेक वर्षांच्या परंपरेनुसार मोह फुलं गोळा करून त्याची दारू काढतात. सध्या झाडावर मोह फुलं बहरली असून जंगलात झालेल्या पान गळतीमुळं झाडाखाली मोठ्या प्रमाणात सुकलेल्या पानांचा खच साचला आहे. जिकडं तिकडं सुकलेली पान जमिनीवर पडली असल्यामुळं पहाटेच्या सुमारास मोहाच्या झाडावरून खाली कोसळणारा फुलांचा सडा हा या सुकलेल्या पानांमध्ये अडकून बसतो. या सुकलेल्या पानांमधून मोहाची फूलं वेचणं सोपं काम नाही. यामुळंच मोहाचे झाड बहरताच झाडाखाली आग लावून त्याखाली असणारी सुकलेली पान पेटवून दिली जातात. यानंतर या सुकलेल्या पानांची राख झाडून दूर केली जाते. यामुळं झाडाखाली पडणारी फुलं सहज वेचता येणं शक्य होतं.
जो पेटवेल आग त्याचाच झाडावर अधिकार : मेळघाटातील एखाद्या आदिवासी व्यक्तीनं आपल्या गावाशेजारी असणाऱ्या मोह फुलाचे झाड निवडतात. झाडाखालील सुकलेल्या पानांना आग लावून झाडाखालचा परिसर जो झाडून स्वच्छ करतो त्या झाडावर संबंधित आदिवासी व्यक्तीचा पूर्ण अधिकार होतो. ज्या व्यक्तीनं त्या झाडाखाली साफसफाई केली केवळ तीच व्यक्ती पहाटे येऊन झाडाखाली पडलेली मोहफुलं वेचते. पहाटे झाडावरून फुलं खाली पडली असताना इतर व्यक्ती त्या ठिकाणी आली तरी या फुलांवर आपला अधिकार नाही याची जाणीव ठेवून कोणीही त्या फुलांना हात देखील लावत नाही. ज्याची मेहनत त्यालाच फळ इतकी प्रामाणिकता आज देखील आदिवासी बांधवांमध्ये जोपासली जाते, अशी माहिती गोरेलाल कालू बेठे यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली.