महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढलं! राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडले, पंचगंगेची पाणीपातळी वाढण्याची शक्यता - Kolhapur Radhanagri Dam - KOLHAPUR RADHANAGRI DAM

Radhanagri Dam : राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी पहाटे सहा दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे.

Kolhapur Radhanagri Dam
राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 1:13 PM IST

कोल्हापूर Radhanagari Dam :कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. धरणक्षेत्रात देखील पावसाचा तडाखा सुरूच असून आज सकाळी राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडले होते. मात्र सकाळी 11.45 वाजता धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आलाय. राधानगरी धरणातून 10068 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राजाराम बंधारा इथं पंचंगेची पाणी पातळी 43 फूट आहे.

कोल्हापूरात पावसाची जोरदार बॅटिंग : गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणी शिरत असल्यामुळं अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. मात्र शनिवारपासून पावसानं काही काळ उसंत घेतल्यानं आणि राधानगरी धरणाचे सातपैकी चार स्वयंचलित दरवाजे बंद असल्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत घट झाली होती. मात्र, मंगळवारपासून पुन्हा पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे 4:50 ते 5:50 या एक तासात 5 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते. त्यातील स्वयंचलित द्वार क्र. 1 बंद करण्यात आला. राधानगरी धरणाचे आता एकूण 6 स्वयंचलित दरवाजे सुरू झाले आहेत. त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसानं जिल्ह्यात विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदीनं 48 फुटांपर्यंत गाठलेल्या पाण्याच्या पातळीत घट व्हायला सुरुवात झाली होती. शहरातील अनेक सकल भागात आलेल्या पुराच्या पाण्याने बंद झालेले रस्ते पुन्हा सुरू होत आहेत. जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली असतानाच काल मंगळवारपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. पहाटे 6 वाजता 172 मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली.

कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढलं : आज पहाटे 4:50 मिनिटांनी क्र 5 चा, 4: 53 मिनिटांनी क्र. 3 चा, 5:16 मिनिटांनी क्र.4 चा, 5: 33 मिनिटांनी क्र.1चा , 5: 55 मिनिटांनी क्र.2 चा असे अवघ्या तासाभरात उर्वरित पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यातील क्र. 1चा दरवाजा बंद करण्यात आला. यामुळे 6 स्वयंचलित दरवाजांमधून 8568 क्युसेक्स तर पॉवरहाऊस मधून 1500 क्युसेक्स असे एकूण 10068 क्यूसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचं टेन्शन पुन्हा वाढणार आहे. पंचगंगेची सध्याची पाणी पातळी 43 फूट 3 इंचांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे.

हेही वाचा

  1. माळीणचं पुनर्वसन, मात्र दहा वर्षांनंतरही जखम भळभळतेय - Malin Landslide disaster
  2. वर्षाला 21 टन माती चालली वाहून; मातीचा एक इंच थर तयार व्हायला लागतात 100 वर्षे - Soil Erosion Problem Amravati
  3. डोळ्यादेखत भावंड नदीपात्रात बुडताना माऊलीनं दाखविलं प्रसंगावधान, नेसलेली साडी सोडून दोघांना वाचविलं! - Ahmednagar Floods News

ABOUT THE AUTHOR

...view details