महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कसब्यात वारं कुणाचं? काँग्रेस विरुद्ध भाजपा लढाईत कोण मारणार बाजी? जाणून घ्या राजकीय समीकरणे - KASBA PETH ASSEMBLY CONSTITUENCY

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 1995 सालापासून भाजपाचा बालेकिल्ला होता. मात्र, 2023 च्या पोटनिवडणुकीत हा बालेकिल्ला काँग्रेसकडं गेला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 BJP Vs Congress in Kasba Peth Assembly Constituency
हेमंत रासने, धीरज घाटे, रवींद्र धंगेकर (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 10:11 AM IST

Updated : Oct 15, 2024, 10:36 AM IST

पुणे : विधानसभा निवडणुकांचं बिगुल आज आज होणार आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागलेत. अशातच पुण्यातील पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात कॉंग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना बघायला मिळतोय. पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करत कॉंग्रेसनं बाजी मारली होती. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

1995 सालापासून कसबा पेठ मतदारसंघात भाजपाचे दिवंगत नेते गिरीश बापट हे आमदार म्हणून निवडून येत होते. सलग 24 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपानं गिरीश बापट यांना निवडणुकीत उतरवलं. त्यानंतर ते खासदार झाले. अशामध्ये कसबा पेठ मतदारसंघातून भाजपानं पुण्याच्या त्यावेळीच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. मुक्ता टिळक या आमदार झाल्या. मात्र, डिसेंबर 2022 मध्ये त्यांचं निधन झालं. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार झाले. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीत कसबा पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचं भाजपासमोर आव्हान आहे.

भाजपामधून कोण-कोण आहेत इच्छुक :कसबा पेठ मतदारसंघासाठी भाजपामधून शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक हे इच्छुक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयार सुरू केली. उमेदवारांमध्ये पोस्टर वॉर सुरू असल्याचं बघायला मिळतंय. 'लगालो दम आ रहे हम' 'अब की बार धीरज घाटे आमदार' असे पोस्टर धीरज घाटे यांच्या समर्थकांकडून शहरात लावण्यात आलेत. तर 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व तयार है हम!' 'करण्यासाठी कसब्यातील समस्यांचा अंत, आमदार होणार रासने हेमंत' अशा आशयाचे बॅनर्स 'फ्रेंड्स ऑफ हेमंत रासने कसबा मतदारसंघ' यांनी लावली आहेत.

काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार : या मतदारसंघामध्ये काँग्रेस रवींद्र धंगेकर यांनाच पुन्हा एकदा संधी देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, असं असलं तरी या मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे, मुख्तार शेख, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी हे इच्छुक उमेदवार आहेत. तसंच काँग्रेसमध्ये पडलेली गटबाजी आणि पक्षातील अंतर्गत वाद याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून देखील अनेक जण इच्छुक असल्यानं महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

  • मतदारांची संख्या किती? : कसबा मतदार संघात 268 मतदान केंद्र आहेत. तर इथं पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 38 हजार 992 असून महिला मतदारांची संख्या 1 लाख 42 हजार 271 आहे. तर 37 तृतीयपंथी मतदार या मतदार संघात आहेत. असे एकूण 2 लाख 81 हजार 300 मतदार या मतदारसंघात आहेत.

हेही वाचा -

  1. कागलच्या राजकारणात नवा 'ट्विस्ट'; संजय मंडलिकांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, मुश्रीफांचं टेशन वाढलं
  2. कोथरूड मतदारसंघात अमोल बालवडकर यांचं मोठं शक्तिप्रदर्शन; नागरिकांना दिला प्रमुख पाहुण्याचा मान - Amol Balwadkar
  3. संगमनेरमध्ये वडलांची गरज नाही मीच भरपूर, थोरातांच्या आव्हानावर सुजय विखेंचा पलटवार - Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat
Last Updated : Oct 15, 2024, 10:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details