जालना -जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला या आशयाचे चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसून, स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. त्याचवेळी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषी व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलय.
दहावी परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी झाल्याची बातमी पोलिसांना लागताच त्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडताना परीक्षा केंद्रावरील गर्दीमुळं पोलीसही हतबल झाल्याच दिसून आलं. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं.
तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलजवळचा जमाव आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती (Etv Bharat Reporter) सुरुवातीला जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, आणि पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील स्पष्टीकरण दिलं आहे.
सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत असल्याची अफवा होती. दहावीच्या परीक्षेचा मराठी पेपर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे फुटला अशीच भावना ही लोकांचीही झाली होती. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्या. शहरातील झेरॉक्स सेंटर मधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक माहिती सर्वत्र पसरत होती. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे जालना जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात 102 परीक्षाकेंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहे.