मुंबई-भाजपा खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'इमर्जन्सी' उद्या देशभरात प्रदर्शित होतोय. या चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच वाद सुरू आहेत, त्यामुळे हा चित्रपट सुमारे 5 महिने उशिराने प्रदर्शित होत आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईतील बीकेसी येथे त्याच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विशेष शोमध्ये भाग घेतला असून, यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि चित्रपटाची संपूर्ण टीम, प्रेक्षक उपस्थित होते.
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील 'खलनायक' :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील 'खलनायक' असं केलंय. खरं तर ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून, या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे चित्रपटात दाखवण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी इमर्जन्सी चित्रपटाच्या कार्यक्रमात म्हटलंय की, 'त्या वेळी (आणीबाणीच्या काळात) इंदिरा गांधी आमच्यासाठी, म्हणजेच माझ्या कुटुंबासाठी, माझ्या वडिलांसाठी आणि माझ्यासाठी खलनायक होत्या. माझ्या वडिलांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. आणीबाणी लागू झाली, तेव्हा फडणवीस 5 वर्षांचे होते. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, भारतातील नवीन पिढीला आणीबाणीच्या काळाबद्दल माहिती असणे महत्त्वाचं आहे. तसेच चित्रपटाचे पहिले स्पेशल स्क्रिनिंग गेल्या आठवड्यात नागपुरात झाले, ज्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खूप कौतुक केलंय.