मुंबईHitendra Thakur Determination :पालघर लोकसभा मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडू लागल्या आहेत. याबाबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे आमदार राजेश पाटील त्यांच्या विरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी तसंच महायुतीचे डॉ. हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करून भाजपाने पालघर जिल्ह्याचे माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे.
ही बिरुदं पाहून लाज वाटते - हितेंद्र ठाकुर :प्रचारादरम्यान जी भाषा वापरली जात आहे. ज्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत याकडे आपण कसं बघता असं विचारलं असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, राजकारणाला आता काही अर्थ उरला नाही. जी काही बिरुदं लावली जात आहेत ती पाहता खरोखर लाज वाटते. कोण कुठल्या पक्षात आज कुठे? उद्या कुठे? काही सांगता येत नाही. गिधाड, सीयार, मेंढक ही प्रचाराची भाषा. सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. जे कालपर्यंत विधान परिषद, राज्यसभेसाठी माझ्या येथे लाईन लावत होते. ते सर्व आज माझ्या विरोधामध्ये एकवटले आहेत. तुमची भाषा कुठली? तुमचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? ३५ वर्ष राजकारणात आहे. सतत भाजपा-शिवसेनेशी लढत आलोय. गरज कधी कोणालाही लागू शकते. जिंकून येण्यासाठी कोणा कोणाला कामाला लावले आहे. आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, सीईओ, कलेक्टर ही काय घरची गोष्ट आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कंत्राटदारांनी कोणती कामे केली ते दाखवा? :ठेकेदारांकडून २०-२० कोटी जमा करण्याचे आदेश पालघरच्या पालकमंत्र्यांनी दिले आहेत, असा थेट आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना ते बोलले की, आपल्याकडे याचा पुरावा आहे. फन हॉटेलमध्ये इतके दिवस रूम कशासाठी बुक करण्यात आले आहेत. तिथे कॉन्ट्रॅक्टर कशाला बोलवता? कुठली कामे झाली आहे ती दाखवा. त्या हॉटेलमध्ये कोणाच्या नावाने रूम बुक आहेत आणि कोण राहतं याची चौकशी करा. 'प्रधानमंत्री हर घर जल जीवन योजना' याने कधीही तुमच्या घरात पाणी पोहोचणार नाही. विवेक पंडित साहेबांनी याबाबत जे सांगितलं आहे की, पंतप्रधानांची योजना चांगली आहे; परंतु राज्य सरकार ती राबवण्यात अपयशी ठरलं आहे, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. तुमच्या घरात पाणी पोहोचलं की नाही, हे बघायला मोदी साहेब येणार आहेत का? हे काम कुणाचं आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.