कोल्हापूर Kolhapur Rain Update : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी (Panchganga River) सध्या धोका पातळीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. राधानगरी धरण सध्या 92 टक्के भरलं आहे. तर अधिक पाणीसाठा होत असल्यानं कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. यंदाही कोल्हापूरकरांना महापुराची धास्ती जाणवत आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केलं असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
अनेक नद्यांना आला पूर :जिल्ह्यात काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसानं मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा धुंवाधार सुरुवात केली आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी सध्या 42 फुटांवरून वाहत असून धोकापातळी ओलांडण्यासाठी अवघ्या एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. तासाला एक इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. संथ गतीनं वाढणाऱ्या पाण्यामुळं कोल्हापूर शहरालगत असलेल्या प्रयाग, चिखली, आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांनी स्थलांतर सुरू केलं आहे. जिल्हा प्रशासनानेही सोनतळी भागात पूरग्रस्तांसाठी आरोग्य पथक पशुवैद्यकीय सेवा तैनात केली आहे. महापुराची स्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं.
जिल्ह्यातील वाहतूक मार्ग झाले बंद :पंचगंगेच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील केर्ली येथे पाणी आल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला आहे. जोतिबा-पन्हाळा मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तर एसटी महामंडळाच्या 12 मार्गावरील 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळं महामंडळाला साडेतीन कोटींचं नुकसान झालं आहे.