पुणे Mangaldas Bandal arrested : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची तब्बल 16 तास ईडीनं कसून चौकशी केली. ही चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. काल दिवसभर मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील तसंच शिरूर येथील निवासस्थानांवर ईडी कडून छापेमारी करण्यात आली होती. यात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं होतं.
5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त -पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी काल ईडी कडून अचानक छापा टाकण्यात आला. मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी ईडीनं कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत त्यांच्या घरात 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच आलिशान कार, एक कोटींची चार घड्याळंही जप्त करण्यात आली आहेत.
16 तास बांदल यांची चौकशी -ईडीकडून तब्बल 16 तास बांदल यांची चौकशी करण्यात आली. यावेळी मंगलदास बांदल यांची मालमत्ता तसंच त्यांच्याकडील संपत्तीसंदर्भात विचारणा करण्यात आली. या चौकशीमध्ये बांदल यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी रेखा बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
वंचितनं उमेदवारी केली होती रद्द - मंगलदास बांदल यांच्या अलिकडील काळातील राजकीय घडामोडी पाहिल्या असता, मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ही उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यावेळी इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता, त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती. त्याची दखल घेऊन वंचित बहूजन आघाडीनं घेऊन मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.