नवी दिल्लीFarmer Protest : शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारुन दिल्लीकडं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनानं दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील केल्या आहेत. दिल्ली ते हरियाणाचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरियाणातून दिल्लीकडं येणारा रस्ताही सील करण्यात आला आहे. मात्र शेतकरी संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
1) दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शंभू या सीमांना पूर्णपणे छावण्यांचं स्वरूप आलं आहे.
2) दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांवर गेट बंद करण्यात आले आहेत.
3) दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतय.
4) एमएसपी (MSP) हमीभावासह अनेक मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. "आम्ही नाही तर सरकारनं रस्ता अडवला आहे," असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
5) "आम्हाला संघर्ष नको, आम्ही शांततापूर्ण आंदोलनाच्या बाजूनं आहोत. केंद्र सरकार आमच्या मागण्यांबाबत अजिबात गंभीर नाही," असंही शेतकरी नेते सांगत आहेत.
6) "आम्ही शेतकरी धान्य पिकवतो आणि सरकार खिळे ठोकण्याचं काम करत आहे. आम्ही लाठ्या आणि अगदी गोळ्यांचा सामना करण्यास तयार आहोत. सरकार फक्त दावा करतं की, त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे, पण तसं अजिबात नाही," अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.