रत्नागिरीPatent Of Rice: राजापूर तालुक्यातील खरवते येथील प्रगतीशील शेतकरी दयानंद बाबाजी चौगुले (Farmer Dayanand Chougule) यांच्या 'मुंडगा' आणि 'सर्वट' या गावठी भात बियाण्यांना भारत सरकारच्या कृषी विभाग आणि डॉ. सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr Sawant Konkan Krishi Vidyapeeth) यांच्याकडून पेटंट प्रमाणपत्र देण्यात आलंय.
पेटंट प्रमाणपत्र देऊन गौरव : खरवते गावचे प्रगतीशील शेतकरी दयानंद चौगुले यांच्या गावठी भात बियाणे 'मुंडगा' आणि 'सर्वट' या भात बियाण्यांची भारत सरकार कृषी विभाग यांनी दखल घेतली असून भारत सरकारच्या कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्याकडून त्याना ११ मार्च २०२४ रोजी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. भावे यांच्या हस्ते पेटंट प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे.
सलग ३ वर्षे दिला आदर्श शेतकरी पुरस्कार: मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या राजापूर तालुक्यातील खरवते या छोट्याशा गावातील दयानंद बाबाजी चौगुले यांना, यापूर्वी कृषी विभाग राजापूर यांच्याकडून सलग ३ वर्षे प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. तर कृषी विभाग रत्नागिरी यांच्याकडून 'आदर्श शेतकरी पुरस्कार' देऊन गौरवण्यात आलं होतं.
भात बियाण्यांना पेटंट प्रमाणपत्र : दयानंद चौगुले हे गेली अनेक वर्षे सातत्यानं शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असून राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडूनही त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. आता त्यांच्या दोन गावठी भात बियाण्यांची भारत सरकारच्या कृषी विभागानं दखल घेतली आहे. त्यांच्या 'मुंडगा' आणि 'सर्वट' या भात बियाण्यांना पेटंट प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळं समाजाच्या विविध स्तरांतून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.