मुंबई- विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर (BMC Election) लक्ष्य केंद्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर आणि गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनं केलेल्या कामांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांची गुरुवारी बैठक घेतली. रात्री उशिरा पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे आजी-माजी खासदार, आमदार आणि माजी नगरसेवक उपस्थित राहीले.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आम्हाला सर्व मुंबईकरांचे स्वप्न असलेली मुंबई विकसित करायची आहे. ही अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीबाबत होती. आमच्या सरकारनं गेल्या अडीच वर्षात केलेल्या सर्व कामांचा थेट फायदा राज्यातील जनतेला होणार आहे. या निवडणुकांसाठी महायुतीनं पूर्ण तयारी केली आहे. तमाम मुंबईकरांचे स्वप्न असलेली मुंबई आम्ही घडविणार आहोत. मुंबईकरांसाठी आम्ही कोस्टल रोडचे काम केले. 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू केला. यासह आणखी अनेक प्रकल्प आहेत. हे सर्व महानगरपालिकेचे प्रकल्प आहेत. याचा थेट मुंबईकरांना फायदा होत आहे".