अमरावती Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता जिल्हा सहकारी बँकेच्या पातळीवर राबवली जाणार आहे. या संदर्भात राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची बुधवारी चर्चा झाली असून हा निर्णय सभागृहात जाहीर करण्यात आला आहे. यामुळच अमरावती जिल्ह्यातील महिलांच्या सुविधेकरता ही योजना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं राबवली जाणार असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिली आहे.
बँकेच्या 94 शाखेत उघडता येणार खातं : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यावर या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच महिलांना खातं काढावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. या योजनेकरता बँकांमध्ये खातं काढण्यासाठी आपल्या भगिनी फार गोंधळलेल्या असल्याचं ग्रामीण भागात फिरताना आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आलं. अशा परिस्थितीत या महिलांचं आर्थिक शोषण देखील केलं जात असल्याचं समोर आलं. या योजनेकरता जिल्हा बँकेत देखील खातं उघडता यावं यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी आदिती तटकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाली असून आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व 94 शाखांमध्ये महिलांना खातं काढता येईल असं अभिजीत ढेपे म्हणाले.