पुणे Supriya Sule On BJP MLA Firing : भाजपा आमदारानं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये रात्री उशिरा घडली. या घटनेत शिंदे गटाचे नेते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की "राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा. तसंच केंद्र सरकारनं राज्य सरकार बरखास्त करावं, अशी मागणी मी करत आहे. याबाबत मी अधिवेशनात बोलणार आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेणार आहे," असंही यावेळी सुळे म्हणाल्या.
पुण्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बालाजीनगर इथं रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं, यावेळी त्या बोलत होत्या.
सरकारचं गँगवॉर रस्त्यावर आलं :संजय राऊत म्हणतात ते लोकांना आवडत नाही. पण ते जे म्हणतात, ते वारंवार खरं होत आहे. कॅबिनेटमध्ये नव्हे तर आता सरकारचं गँगवॉर रस्त्यावर आलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. जे झालं आहे ते गुंडाराज आहे. आज जे काही झालं तो मुद्दा मी संसदेत उचलणार आहे. देशाचे गृहमंत्री यांची वेळ मागणार आहे. त्यांना याबाबत मी सांगणार आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सत्तेच्या मस्तीतून पोलिसांसमोर गुंडाराज :"पोलिसांसमोर गोळीबार होत असेल, तर हे गुंडाराज आहे. एवढी यांची सत्तेची मस्ती असेल तर याला गुंडाराज नाही तर काय म्हणायचं. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो, की पोलीस आम्हाला हक्क मिळवून देतील. पण सत्तेतील आमदाराची हिम्मत कशी होते हे करण्याची ? गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाचा व्यक्ती आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागेलच," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यास गुन्ह्यात वाढ :उल्हासनगर येथील घटनेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात जेव्हा जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले, तेव्हा तेव्हा क्राईममध्ये वाढ होते. हे मी सांगत नाहीये, तर आकडेवारी सांगत आहे, असं देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दोन दिवसात जागा वाटपचा फॉर्म्युला ठरेल :प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की "पुढच्या एक ते दोन दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपचा फॉर्म्युला ठरेल. जागा वाटप होईल, तेव्हा कुणाला किती जागा हे ठरेल. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर यावं आणि दिल्लीत पण नेतृत्व करावं. ते आमचे नेते आहेत, त्यांनी फक्त राज्य नव्हे, तर देशपातळीवर आमचं नेतृत्व करावं," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा :
- 'आत्मरक्षणासाठी केला गोळीबार, मुख्यमंत्र्यांनी राज्यभर गुन्हेगार पाळून ठेवले'; गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप
- भाजपा आमदार गोळीबार प्रकरण; देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश