बीड : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आज एसआयटीनं वाल्मिक कराड याला बीडच्या न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयानं एसआयटीवर प्रश्नांची सरबत्ती केली. केवळ फोन कॉलच्या आधारे वाल्मिक कराडला खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी केलं का, असा सवाल न्यायालयानं केला. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराड याला 7 दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली. अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीला अडथळा ठरल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा दावा यावेळी अधिकाऱ्यांनी केला.
वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी :वाल्मिक कराड याला आज सकाली केज न्यायालयात न नेता बीड इथल्या जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड याच्यावर विविध आरोप केले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी 20 मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचा आरोप एसआयटीच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. दोन्ही बाजुंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराड यांना 7 दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली आहे.
वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर चर्चा :आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात वाल्मिक कराड याला 02 वाजता हजर केल्यानंतर 03 वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि वाल्मिक कराड याचे वकील अशोक कवडे यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी एसआयटीचे अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयाला हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले याच्याबरोबर वाल्मिक कराडचं बोलणं झालं, अशी माहिती मिळत आहे. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात दहा मिनिट संभाषण झालं, असा दावा केला.