मुंबईLok Sabha Election Results 2024 :मी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली तेव्हाच कॉंग्रेसला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय समोर ठेवले होते. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला साथ दिली व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. त्याचा आनंद आहे, असं मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. पटोले यांनी महाराष्ट्रातील तरुणांचे, शेतकऱ्यांचे, गरीबांचे कॉंग्रेस पक्षातर्फे मनापासून आभार व्यक्त केले.
लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार :देशात परिवर्तनाची लाट आली त्याचे नेतृत्व राहुल गांधींनी केले. मोदी सरकार विरोधात जनतेची लढाई होती. या लढाईला खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी वाचा फोडली. कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा व मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा काढली हे त्याचे फलित आहे. मोदींशिवाय कोणीही नेता प्रभावशाली राहू शकत नाही, असा विचार रुजवला जात होता. लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे. त्या मताच्या आधारे सत्तेचा गर्व करणाऱ्यांना सत्तेबाहेर काढण्याचे काम जनतेने केले आहे. माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा विचार असणाऱ्यांना परिवर्तन करून दाखवले आहे. असंविधानिक व्यवस्था चालू शकणार नाही ही शिकवण दिली, असे पटोले म्हणाले. पत्रकार परिषदेला खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री आरिफ नसीम खान उपस्थित होते.
गुणवत्तेवर निर्णय व्हावा हीच भूमिका :जनतेपेक्षा देशात कोणीही मोठा नाही, हे लोकशाहीने समजावून सांगितले आहे. या परिवर्तनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार पटोले यांनी व्यक्त केले. हा विजय खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा, जनतेचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराने नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला मतांच्या अधिकाराने खुर्चीवरून खाली खेचले, असे पटोले म्हणाले. आगामी चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकत्रित आणण्याचे आमचे ध्येय आहे. जागावाटपात ज्या गडबडी होतात त्याचा अंदाज घेऊन गुणवत्तेवर निर्णय व्हावा अशी आमची भूमिका होती, असं नाना पटोले म्हणाले.