सातारा PF Money Transfer to GF: एका कंपनीत पर्यवेक्षक आणि अकाउंटचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं कामगारांचे पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये (PF Money Fraud) चक्क आपल्या प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वर्ग केल्याची घटना साताऱ्यात घडलीय. याप्रकरणी पर्यवेक्षकासह त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) याला फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पर्यवेक्षकासह प्रेयसीवर गुन्हा दाखल : सातारा शहराजवळील धनगरवाडी-कोडोली येथील एका कंपनीच्या कामगारांची पीएफ आणि एसआयची १५ लाख रुपयांची रक्कम, पर्यवेक्षक मंगेश दुदकर याने प्रेयसीच्या बॅंक खात्यावर पाठवून मोठी फसवणूक केल्याचा प्रकार कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आला. त्यानंतर पर्यवेक्षक आणि त्याच्या प्रेयसीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पर्यवेक्षकाला अटक केली.
पीएफ आणि विम्याच्या पैशाची अफरातफर : सोमनाथ रामचंद्र किर्दत (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) यांनी यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार दिनांक २ नोव्हेंबर २०२२ पासून १४ जानेवारी २०२४ पर्यंत संबंधित कंपनीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. पर्यवेक्षक आणि अकाऊंटचे काम पाहणाऱ्या मंगेश दुदकर याने कंपनीच्या बॅंक खात्यातील पीएफ आणि एसआयचे १५ लाख रुपये कामगारांच्या खात्यावर जमा न करता ते प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळते केले. तसेच ती रक्कम कामगारांच्या खात्यावर ऑनलाईन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या. त्यामुळं मंगेश दुदकर आणि त्याच्या प्रेयसी विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी संशयित मंगेश दुदकरला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.
हेही वाचा -
- पुण्यातून अपहरण झालेल्या मुलाची साताऱ्यात सुटका; 70 लाखांच्या खंडणीसाठी केलं होतं अपहरण
- क्रीडा शिक्षकाचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटना
- कराडमध्ये शस्त्राने सपासप वार करून तरूणाची भर चौकात हत्या, हल्लेखोर फरार