मुंबई Lok Sabha Elections 2024 : महायुतीच्या वादात अडकलेल्या ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग - रत्नागिरी, ठाणे, कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार घोषीत केले नाहीत. (Lok Sabha seats) विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचंही नाव पहिल्या यादीत घोषीत न करता श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Shinde) वेटिंगवर ठेवलं आहे. एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांपैकी 7 खासदारांना उशिराका होईना पण घोषीत केलेल्या पहिल्या यादीत स्थान देऊन निष्ठावंतांसाठी एकनाथ शिंदे यांनी पूर्ण ताकद पणाला लावल्याचं दाखवून दिलं आहे. परंतु, इतर निष्ठावंतांचं काय? हा त्यांच्यासमोर सध्या मोठा प्रश्न आहे. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने त्याचबरोबर कोल्हापुरातील खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून नकारात्मक अहवाल आल्याने त्यांची उमेदवारी कापली जाण्याची चिन्ह होती. परंतु, अशाही परिस्थितीत त्यांना उमेदवारी देण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे. परंतु, रामटेकमध्ये शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांना भाजपच्या नकारात्मक अहवालाचा फटका बसला असून, त्या ठिकाणी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे.
ठाणे, कल्याण यामधील भाजपला एक जागा हवी : यवतमाळ-वाशिममधून खासदार भावना गवळी या इच्छूक असल्या तरीही भाजपच्या नकारात्मक अहवालामुळे हा विषय भावना गवळी यांच्यासाठीच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासाठीही डोकेदुखी ठरत आहे. नाशिकबाबत सुद्धा हीच परिस्थिती आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी तीनवेळा शक्तिप्रदर्शन करत त्यांची ताकद दाखवून दिली आहे. तरीही अद्याप त्यांच्या उमेदवारीबाबत सांशकता आहे. नाशिकची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची जास्त चिन्ह असून त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. या कारणाने नाशिकसारखी हक्काची जागा शिंदे गटाला सोडावी लागणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाला उमेदवार सापडतच नसल्याकारणानं त्यांनी फिल्म अभिनेता, माजी खासदार गोविंदा आहुजा यांना पक्षात प्रवेश दिला आहे. असं असलं तरी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे पण नाराज आहेत. ठाणे आणि कल्याण यामध्ये अद्याप समझोता होत नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागा भाजपला हवी आहे. जर ठाणे शिंदे गटाने घेतली तर कल्याणच्या जागेवर भाजप दावा करत आहे. या सर्व कारणांनी मुख्यमंत्र्यांचे टेन्शन वाढलेलं आहे.
आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत: याबाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते एडवोकेट वैजनाथ वाघमारे म्हणाले आहेत की, आम्ही आमचे ८ उमेदवार घोषीत केले असले तरीसुद्धा इतरही उमेदवार लवकरच घोषीत होणार आहोत. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषीत केली नसली तरी ती उमेदवारी ठाम आहे. आम्हाला घराणेशाही चालवायची नाही. एकनाथ शिंदे हे महायुतीत सर्वांच्या हिताचा विचार करूनच पावलं उचलत आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही. नाशिकचे हेमंत गोडसे असतील किंवा वाशिमच्या भावना गवळी यांना उमेदवारी नक्की दिली जाणार आहे. त्यामुळे इतरांनी आमची चिंता करू नये. तुमच्याच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या महाभारताकडे तुम्ही लक्ष द्या, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
भाजप शिंदे यांना त्यांच्या मर्जीनुसार कधीच जागा देणार नाही : या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 18 जागा होत्या. खरी शिवसेना ही शिंदे यांचीच असेल तर त्यांनी फक्त ८ जागा घोषीत केल्या आहेत. उर्वरित 10 जागांच काय? वास्तविक भाजप हा शिंदे यांना त्यांच्या मर्जीनुसार जागा कदापी देणार नाही. भाजपने निवडणुकीसाठी जो सर्वे अहवाल केला आहे तो स्वतःची पाठ थोपटण्याचं काम त्यांनी केलं आहे. शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्या गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी ही भाजपची मनापासून इच्छा आहे. तर या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत की, जे बाळासाहेबांचे निष्ठावंत म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर ते बाळासाहेबांचे निष्ठावंत म्हणून नाही तर सत्तेचे निष्ठावंत होते. म्हणून आज भावना गवळी, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित यांच्यावर ही परिस्थिती आली आहे. यांना आता भाजपची चाकरी करावी लागत आहे. खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असून आता खरे निष्ठावंत कोण? ते लवकरच समोर येईल. असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे.