मुंबई Eknath Shinde On Manoj Jarange : मंगळवारपासून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं नेहमीप्रमाणे चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षानं केलेल्या आरोपांचं खंडन करताना विरोधी पक्षावर टीका केली. तसंच, सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापत असून, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपाची मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलीच दखल घेतलीय. "कोणी कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही. कायदा, सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल," असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक जरांगे पाटील यांनी दिला आहे.
विरोधकांचे आरोप खोटे :"राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अर्थमंत्री अजित पवार उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यात अनेक विकासकामं झाली आहेत. मात्र, विरोधकांनी केलेले आरोप खोटे आहेत," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "मी विरोधकांचं पत्र वाचलं. महानंदा डेअरी गुजरातला नेणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हे खोटे आहे. राज्यात अनेक विकासकामे झाली आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, मात्र विरोधक खोटा प्रचार करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र अत्यंत चुकीचे आरोप केले जात आहेत. जे आंदोलक आहेत, ते आता राजकीय भाषा वापरत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारणाचा संशय येतो आहे आहे. राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये," असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
आत्मविश्वास हरवून बसलेला विरोधीपक्ष : यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. "मी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पाहिली नाही. मात्र, त्यांनी आम्हाला लेटरहेडवर पत्र दिलं आहे. विरोधी पक्षनेते संभ्रमात आहेत. विरोधी पक्षाचा आत्मविश्वास हरवलेला आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. राज्यात अनेक विकासकामे झाली आहेत. राज्यातील विकासामुळं त्यांच्या पोटात दुखत आहे. राज्यात गुंतवणूक वाढली आहे. दावोसमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षाचे नेते बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. या सरकारनं 10 टक्के मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मी आरक्षणाचं वचन पाळलं. मराठा आरक्षण टिकणार नाही, असं काहींचं म्हणणे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणालं. आरक्षण टिकवण्यासाठी सरकार पूर्ण ताकद लावेल. आरक्षण का टिकणार नाही याची कारणे, कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आम्ही कोणालाही फसवणार नाही, विरोधकांनी आम्हाला सहकार्य करावं. मात्र, विरोधी पक्षाचे नेते मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत," असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.